India A vs USA T20 World Cup Warm UP Match : टी-20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. मात्र त्याआधी स्पर्धेसाठी संघांची तयारी तपासण्यासाठी वार्म-अप सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वार्म-अप सामन्यांना सोमवारपासून सुरुवात होईल. पहिल्याच दिवशी तीन सामने खेळवले जाणार असून, इंडिया अ संघाचा सामना यूएसएशी होणार आहे. याशिवाय कॅनडाचा संघ इटलीविरुद्ध, तर अफगाणिस्तानचा संघ स्कॉटलंडविरुद्ध मैदानात उतरेल.
तिलक वर्माचा इंडिया अ संघात समावेश
वार्म-अप सामन्यांमध्ये भारत हा एकमेव देश आहे जो आपल्या अ संघाला मैदानात उतरवत आहे. या सामन्यासाठी इंडिया अ संघात तिलक वर्माचा समावेश करण्यात आला आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला तिलक वर्मा या सामन्यानंतर भारतीय मुख्य संघाच्या कॅम्पमध्ये सहभागी होणार आहे. यूएसएविरुद्धचा हा सामना त्याच्यासाठी फिटनेसची चाचणी तसेच खेळाच्या लयीत परत येण्याची संधी ठरणार आहे.
आयुष बदोनीकडे कर्णधारपद
यूएसएविरुद्ध मैदानात उतरणाऱ्या इंडिया अ संघाचे कर्णधारपद आयुष बदोनीकडे सोपवण्यात आले आहे. संघात एन. जगदीशन आणि उर्विल पटेल यांचा विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, रियान पराग आणि मयंक यादव हे दोघेही पूर्णपणे फिट झाल्यानंतर संघात परतले आहेत. संघात नमन धीर, आशुतोष शर्मा, रवि बिश्नोई, खलील अहमद यांसारख्या खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.
भारताचे दोन सराव सामने कधी आणि कुठे होणार?
भारत अमेरिका आणि नामिबियाविरुद्ध दोन सराव सामने खेळणार आहे. अमेरिकेविरुद्धचा सामना सोमवारी (2 फेब्रुवारी) म्हणजेच आज संध्याकाळी 5 वाजता नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. दुसरा सामना शुक्रवारी (6 फेब्रुवारी) सेंटर ऑफ एक्सलन्स येथे नामिबियाविरुद्ध होईल.
मयंक यादव देखील संघात
युवा जलदगती गोलंदाज मयंक यादवलाही भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये कहर करणाऱ्या आणि टीम इंडियामध्ये पोहोचलेल्या मयंक यादवने बराच विलंबानंतर पुनरागमन केले आहे. तो यापूर्वी आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसला होता, परंतु दुखापतीमुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता.
यूएसएविरुद्ध वार्म-अप सामन्यासाठी इंडिया अ संघ – आयुष बदोनी (कर्णधार), नमन धीर, आशुतोष शर्मा, प्रियांश आर्य, एन. जगदीशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रियान पराग, मानव सुथार, अशोक शर्मा, उर्विल पटेल (विकेटकीपर), गुरजपनीत सिंह, विप्रज निगम, रवि बिश्नोई, खलील अहमद, मयंक यादव.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:18 02-02-2026














