रत्नागिरी : राजकारण आणि निवडणुकांच्या रणधुमाळीत अनेकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात, मात्र रत्नागिरीतील जाकी मिऱ्या – आनंदनगर भागात माणुसकीचे दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. प्रचारात व्यस्त असतानाही एका वृद्ध महिलेचे प्राण वाचवण्यासाठी उमेदवाराने दाखवलेली तत्परता सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
नेमकी घटना काय?
जाकी मिऱ्या येथील आनंदनगर कॉलनी परिसरातील माळरानावर काल जंगलात भीषण आग लागली होती. याच दरम्यान, घरासाठी लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या नेत्ता भिकाजी जाधव (वय ६५) या वृद्ध महिला आगीच्या विळख्यात सापडल्या. आगीची तीव्रता जास्त असल्याने त्या गंभीररीत्या होरपळल्या आणि मदतीसाठी टाहो फोडू लागल्या.
प्रचार थांबवून मदतीला धावले ‘अबू भाटकर’
योगायोगाची बाब म्हणजे, याच वेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे उमेदवार आदेश उर्फ अबू भाटकर हे आपल्या सहकाऱ्यांसह आनंदनगर भागात प्रचारासाठी आले होते. आगीची बातमी आणि महिलेचा आक्रोश ऐकताच अबू भाटकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला प्रचार थांबवला.
त्यांनी मयुरेश पाटील, सौ. पाटील, राधिका राजेंद्र जाधव, सावी जाधव, मैथिली जाधव, गौतम पवार आणि इतर सर्व सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीतून या वृद्ध महिलेला बाहेर काढून त्यांनी स्वतःच्या प्रचाराच्या वाहनातून त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले.
परिसरातून कौतुकाचा वर्षाव
निवडणुकीच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात मतांचा जोगवा मागण्यापेक्षा एका जीवाचे प्राण वाचवण्याला अबू भाटकर यांनी प्राधान्य दिले. त्यांच्या या तत्परतेबद्दल आनंदनगरचे रहिवासी आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संपर्क प्रमुख राजू जाधव यांनी त्यांचे जाहीर आभार मानले आहेत.
“मतदान आणि राजकारण आपल्या जागी आहे, पण अशा संकटकाळात मदतीला धावून येणे हेच खऱ्या लोकप्रतिनिधीचे लक्षण आहे. अबू भाटकर यांनी आज आपल्या कार्याची तत्परता दाखवून दिली आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सध्या सदर महिलेवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘प्रचारापेक्षा प्राण महत्त्वाचे’ मानणाऱ्या या उमेदवाराच्या कृतीला सोशल मीडियावरही मोठी पसंती मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:36 02-02-2026














