देवरुखात महिन्याला तीन टन खतनिर्मिती

साडवली : देवरुख नगर पंचायतीमार्फत सुरू करण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्पांतर्गत महिन्याला तीन टन खताची निर्मिती करण्यात येत आहे. खताची विक्री करण्यासाठी राज्य सरकारकडून हरित कंपोस्ट खत ब्रॅड मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यानंतरच शेतकऱ्यांना खताची विक्री करण्यात येणार आहे. ब्रॅड मिळावा यासाठी पालिकेकडून पाठपुरावा करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी सांगितले.

शहरातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे याकरिता घनकचरा निर्मितीच्या जागीच कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येते. या खताची गुणवत्ता तपासून शासनामार्फत ब्रॅड देण्यात येणार आहे. कचरा घंटागाडीत द्यावा यासाठी पालिकेकडून जनजागृती करण्यात येत आहे. देवरूख शहरातून दिवसाला ओला कचरा दीड टन, तर सुका कचरा दीड टन संकलित केला जातो. तीन घंटागाड्या आणि एक ट्रॅक्टरच्या साह्याने कचरा गोळा केला जातो. या कचऱ्याचे विलगीकरण करून कंपोस्ट खतनिर्मिती केली जाते. ओल्या कचऱ्यावर एक्स्प्रेस मशीनच्या साहाय्याने प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार केले जाते, तर सुका कचरा कापड, काच आणि प्लास्टिक असा वर्गीकरण करून ठेवण्यात येत आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी गॅसी फायर मशीन घेण्यात येणार आहे. यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देवरूख पंचायतीच्या हद्दीतील कांजिवरा भागात घनकचरा प्रकल्प सुरू आहे. ४२ लाख ४२ हजार रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा केला आहे.

खताचा नमुना तपासणीसाठी राहुरीला
नगर पंचायतीमार्फत लागवड करण्यात आलेल्या वृक्षांसाठी खताचा उपयोग केला जातो. खताला हरित ब्रेड मिळावा बासाठी पाठपुरावा केला जात आहे. खताचा नमुना राहुरीला पाठवण्यात आला आहे. ब्रेड उपलब्ध झाला की, नागरिकांना खताची विक्री करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 29/Oct/2024