रत्नागिरी : रत्नगिरी जिल्हा टीबीमुक्त करण्यासाठी क्षयरोग विभागाच्या वतीने १ जुलै ते ३१ डिसेंबरपर्यंत घरोघरी जाऊन संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत तब्बल १५५ क्षयरुग्ण आढळले आहेत. त्यांची तपासणी करून पुढील उपचारासाठी प्राथमिक केंद्र, सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. रत्नागिरी क्षयरोग विभागास वर्षभरासाठी २०५० तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. एका वर्षात क्षयरोग विभागाच्या वतीने तपासणी करून टार्गेट पूर्ण केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरात टीबीमुक्त भारत अभियान नुकतेच राबवण्यात आले. रत्नागिरी क्षयरोग विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण केले. ६० वर्षांवरील व्यक्ती, एकदा टीबी होऊन गेलेली व्यक्ती, पुन्हा टीवी झालेल्या व्यक्ती यासह विविध आजार, टीबीची सुरुवात अशा संशयितांची तपासणी करून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, सर्वेक्षणासाठी ३७६ उपकेंद्रांची टीम, १ हजार ४०१ आशासेविका व विविध कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करीत आहेत. २५ हजारहून अधिक संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १५५ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी १ हजार रुपये देण्यात येते. टीबी रुग्णांना खर्च अधिक लागत असतो, त्यामुळे जिल्ह्यातील टीबी रुग्णांना पोषण आहारा मिळावा यासाठी दानशूर, संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे करत आहेत. आणखी संघटना, संस्था, दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी मोठ्याप्रमाणात पुढे येणे गरजेचे आहे.
आता १५ ते ५९ वयोगटातील रुग्णांची होणार तपासणी
क्षयरोग विभागाच्या वतीने आता दुसऱ्या टप्प्यात १५ ते ५९ वयोगटातील संशयित रूग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. ही मोहीम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यासह राज्यभरात सुरू होणार आहे. यासंदर्भात लवकरच नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा टीबीमुक्त करण्यासाठी क्षयरोग विभागाच्या वतीने १ जुलै ते ३१ डिसेंबर दरम्यान घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. ६० वर्षांपुढील रुग्णांची तपासणी करण्यात आली. वर्षभरासाठी २०५० तपासणीचे उद्दिष्ट होते. रत्नागिरी क्षयरोग विभागाने वर्षभरात संशयिताची तपासणी पूर्ण करून उद्दिष्ट पूर्ण केले. १५५ हून अधिक संशयितांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, त्यांना उपचारासाठी पाठवले आहे- महेंद्र गावडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:58 PM 02/Feb/2026














