नेवरे येथे गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे लावगणवाडीतील श्रीगजानन महाराज मंदिर येथे प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दि. ४ ते दि. ८ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी काकड आरती, पंचामृती पूजा आणि अभिषेक, सुदर्शन याग, महिलांसाठी हळदीकुंकू, रात्री श्रीगजानन महाराज नमन मंडळातर्फे बहुरंगी नमन सादर करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी श्रींची पूजा, पालखी मिरवणूक, नैवेद्य, विनायक केळकर यांचे घरी ‘श्रीं’ची पालखी मुक्काम, भजन होणार आहे. शुक्रवार, दि. ६ रोजी ‘श्रीं’ची पूजा, पालखी मिरवणूक, नैवेद्य, पालखी मंदिरात येईल. त्यानंतर, आरती, प्रसाद, हरिपाठ होणार आहे. शनिवारी पंचामृती पूजा आणि अभिषेक, मूर्ती वर्धापन दिन, महाप्रसाद, हभप अमृता नवाथे यांचे कीर्तन, भजन होणार आहे.

रविवार, दि. ८ रोजी मध्यरात्री श्रीगजानन विजय ग्रंथ पारायणाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर, पहाटे काकड आरती, महाअभिषेक व पूजा, प्रवचनकार प्रा.सु.ग. शेवडे यांचे ‘जगाचा करण्या उद्धार! गजानन रूपे अवतार’ विषयावर प्रवचन आयोजित केले आहे. त्यानंतर, ‘श्रीं’ची आरती व नैवेद्य, महाप्रसाद, सायंकाळी कोतवडे येथील विजयबुवा मयेकर यांचे भजन व रात्री गुहागर-चिखली येथील तरुण मित्र नमन मंडळाचे बहुरंगी नमन हाेणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीगजानन महाराज विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:26 02-02-2026