खेड : साडेचौदा लाख खर्चुनही रस्ता खड्ड्यात

खेड : नगरपालिका हद्दीतील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी नगर प्रशासनाने सहा महिन्यात १४ लाख ५८ हजार १९६ रुपयांच्या निधीची उड्डाणे घेतली आहेत. मलमपट्टी करूनही मार्ग खड्ड्यातच असून, वाहनचालकांसह पादचाऱ्यांचा मनस्ताप कायम आहे. लाखोंचा निधी ठेकेदारांच्या घशात घालण्याचा प्रताप केल्याचा आरोपही सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी केला आहे.

खेड नगरपालिका हद्दीतील योगिला दंत महाविद्यालयापासून अण्णाच्या पऱ्यानजीकचा मार्ग पुरता खड्ड्यात गेला आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांचा विस्तार वाढल्याने खड्डे बुजवण्यासाठी ४ वेळा उपोषणाचा मार्ग पत्करल्यानंतर नगर प्रशासनाने वेळोवेळी आश्वासने देताच उपोषणे स्थगित केली होती. खड्डे बुजवण्यासाठी केवळ मालमपट्टी करण्यात आल्याने गेल्या सहा महिन्यांत साडेचौदा लाखांहून अधिक निधी खड्ड्यातच मुरला. हा निधी नेमका कुणाच्या घशात घातला ? मलमपट्टीच्या प्रकारामुळेच मार्ग अजूनही खड्ड्यात असून, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करायलाच हवी, अशी मागणी मोरे यांनी केली आहे. नऊ लाखांचा खर्च पालिकेने मार्च महिन्यात खांबतळे, तीनबत्तीनाका, सोनारआळी, कॉर्नरपासून ते क्षेत्रफळनगरपर्यंतचे खड्डे बुजवण्यासाठी ९ लाख ८४ हजार ६५३ रुपये खर्च केले. जून महिन्यात दोनवेळा खड्यांवर डांबरीकरणासाठी अनुक्रमे १ लाख ३४ हजार ९३८ आणि १ लाख १३ हजार १६० रुपये खर्चुन खड्डे बुजवले. तरीही जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत कायमच राहिली.

ऑगस्ट महिन्यातही मार्गाची दयनीय अवस्था झाल्यानंतर २ लाख २४ हजार ६४५ निधी खर्चुन मार्ग सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. गेल्या ६ महिन्यात १४ लाख ५८ हजारांहून अधिक रुपयांचा निधी खर्चुनही खड्ड्यांची समस्या कायम आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 29/Oct/2024