रत्नागिरी | प्रतिनिधी कोकणातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आज, मंगळवार ३ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या तीन मोठ्या सभा होणार असून, महायुतीच्या प्रचाराला यामुळे मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर प्रचाराला पुन्हा सुरुवात
काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २८ जानेवारी रोजी चिपळूण येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे ती सभा रद्द करण्यात आली होती. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण राज्यासह कोकणातील निवडणूक प्रचारावरही शोककळा पसरली होती आणि प्रचाराची गती मंदावली होती. आता या शोकातून सावरत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले असून, आजच्या सभांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभांचे सविस्तर वेळापत्रक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकणात दोन जिल्ह्यांत एकूण तीन सभांना संबोधित करतील:
- चिपळूण सभा: दुपारी १२.३० वाजता, इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह.
- रत्नागिरी सभा: दुपारी २.०० वाजता, साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ.
- कुडाळ (सिंधुदुर्ग) सभा: सायंकाळी, कुडाळ हायस्कूलचे पटांगण.
दिग्गज नेत्यांची मांदियाळी
रत्नागिरीतील सभांच्या वेळी व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना सचिव संजय मोरे, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आणि राहुल पंडित यांसारखे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
यानंतर मुख्यमंत्री सिंधुदुर्गकडे रवाना होतील, जिथे आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे जाहीर सभा पार पडेल.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचे महत्त्व
जिल्हा परिषद निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे या बालेकिल्ल्यात आपले स्थान भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचा हा दौरा अत्यंत कळीचा ठरणार आहे. विशेषतः चिपळूण आणि रत्नागिरी या दोन महत्त्वाच्या केंद्रांवर मुख्यमंत्री काय भाष्य करतात आणि विरोधकांना कसा इशारा देतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 03-02-2026














