देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली गावी शास्त्री नदीच्या काठावर ग्रंथ श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकीर्तन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी सर्व भक्तगण भक्ती रसात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हा सोहळा ह. भ. प. काशीराम भुरवणे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. यावेळी तालुक्यातील पिरंदवणे, माळवाशी, वाशी, लोवले, मुचरीपासून ते अगदी सह्याद्रीच्या कुशीतील नायरी, निवळी, शृंगारपूर आदी चाळीस गावांतील हजारो वारकरी मंडळींनी सहभाग घेतला होता.
पहाटे स्थानिक वारकऱ्यांनी वीणा व घट पुजन केल्यानंतर या कार्यक्रमाची सुरवात झाली. यानंतर काकड आरती, ह. भ. प. काशीराम महाराज यांचे ज्ञानेश्वरी पारायण, महाप्रसाद, मुरादपूर येथील ह. भ. प. रमेश बंडागळे महाराज यांचे प्रवचन पार पडले. सामुदाईक हरिपाठ, ह. भ. प. संजय कांबळे महाराज यांचे हरिकीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे निमंत्रक ह. भ. प. सदाशिव बांचीम होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी विणेकरी, स्वयंम करंडे, मृदंगमणी हर्ष साळवी व प्रथमेश वाघे यांची साथ लाभली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 03/Feb/2026














