शेतकऱ्यांची बँक ठरली ‘इनोव्हेटिव्ह’; रत्नागिरी जिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावर दोन पुरस्कार!

रत्नागिरी: सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मे. इ प्लस इंटेलेक्च्युअल मिडीया, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘को-ऑप. बँक्स टॉप १०० समिट २०२५’ मध्ये बँकेला “बेस्ट बँक ऑफ द इअर” आणि “इनोव्हेटिव्ह बँक ऑफ इअर” या दोन पुरस्कारांनी गौरवण्यात आले. खोपोली येथील नोवोटेल हॉटेलमध्ये ३१ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या भव्य सोहळ्यात निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ५००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार करणाऱ्या या बँकेने सलग १५ वर्षे ‘अ’ ऑडीट वर्ग टिकवून ठेवला असून, गेली १३ वर्षे बँकेचा नक्त एन.पी.ए. (Net NPA) शून्य टक्के राहिला आहे, ही सहकार क्षेत्रातील एक ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.

बँकेची दैदिप्यमान आर्थिक कामगिरी आणि प्रगती

बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बँकेने ३१ मार्च २०२५ अखेर २८६६.८७ कोटींच्या ठेवी आणि २१९९.६४ कोटींचे कर्जवाटप करून ५००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा ओलांडला आहे. तळागाळातील शेतकरी आणि सामान्य जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी बँक सातत्याने प्रयत्नशील असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत १९ ए.टी.एम. सेंटर्सच्या माध्यमातून डिजिटल बँकिंग सेवा पुरवत आहे. सहकारी संस्थांच्या सबलीकरणासाठी दरवर्षी बँकिंग कार्यशाळा आणि शेतकरी मेळावे आयोजित करून बँकेने सहकारात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

मान्यवरांची उपस्थिती आणि सन्मान सोहळा

या गौरव सोहळ्याला इंडियन बँकिंग असोसिएशनचे डेप्युटी सीईओ श्री. गोपाळ भगत, महाराष्ट्र राज्य बँकेचे माजी कार्यकारी संचालक श्री. प्रमोद कर्नाड, रिझर्व्ह बँकेचे संचालक मा. सतीश मराठे आणि महाराष्ट्र को. ऑप. बँक फेडरेशनचे अध्यक्ष श्री. अजय ब्रम्हेचा यांसारख्या दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी बँकेचे संचालक श्री. मधुकर टिळेकर, श्री. रामचंद्र गराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर, सरव्यवस्थापक श्री. समीर दळवी आणि उपसरव्यवस्थापक श्री. संतोष खेडसकर उपस्थित होते. या यशाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातून बँकेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.