देवरुख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ एसटी स्टॉपजवळ रविवारी दुपारी अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला भरधाव कारने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. तानाजी गोपाळ बेटकर (७६ रा. शेनवडे बेटकरवाडी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे.
दुपारच्या सुमारास तानाजी बेटकर हे महामार्ग ओलांडून कडवईच्या दिशेने पायी जात असताना, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका होंडा अमेझ कारने (०१ ४५८१) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत तानाजी बेटकर यांना गंभीर दुखापत झाली. कारचेही नुकसान झाले. रस्त्याची परिस्थिती आणि वाहतुकीचा अंदाज न घेता कारचालकाने वाहन भरधाव वेगाने चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी एकनाथ रंगा बेटकर (५६ वर्षे) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संगमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 03/Feb/2026














