रत्नागिरीत क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली ३६ लाखांचा डल्ला; फेसबुकवरील मैत्री मिरजोळेतील व्यावसायिकाला पडली महाग

रत्नागिरी : रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एम.आय.डी.सी. परिसरातील एका व्यावसायिकाला सायबर भामट्यांनी तब्बल ३६ लाख ६४ हजार ७४० रुपयांचा गंडा घातला आहे. फेसबुकवरून ओळख वाढवून, क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.

फेसबुकवरील मैत्री आणि गुंतवणुकीचे आमिष

मिरजोळे एम.आय.डी.सी. येतील एका व्यावसायिकाची ओळख फेसबुकच्या माध्यमातून सुहानी शर्मा नावाच्या महिलेशी झाली. सुहानीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि तिचा मित्र ‘डॅनियल’ हा ‘trustincoin’ या क्रिप्टो करन्सी मार्केटच्या वेब ॲप्लिकेशनचा सिनिअर अकाऊंट मॅनेजर असल्याचे सांगितले. कमी वेळेत यु.एस.डी.टी. (USDT) ट्रेडिंग करून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीला जाळ्यात ओढण्यात आले.

अशी झाली ३६ लाखांची फसवणूक

भामट्या डॅनियलने व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून फिर्यादीला ‘trustincoin’ हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये लॉगिन करण्यास सांगितले. २२ जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ या अल्पावधीत आरोपींनी फिर्यादीची वेळोवेळी दिशाभूल केली. ट्रेडिंगच्या नावाखाली जास्तीत जास्त पैसे गुंतवण्यास भाग पाडले. फिर्यादीने नफ्याच्या आशेने टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवले, मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत आरोपींनी फिर्यादीचे ३६ लाख ६४ हजार ७४० रुपये लंपास केले होते.

पोलीस तपास आणि गुन्हा नोंद

याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यावसायिकाने रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी सुहानी शर्मा (रा. कलकत्ता) आणि डॅनियल (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९ (२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) व (डी) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ०३/२०२६ नुसार नोंद केला आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 03-02-2026