रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील खेडशी चांदसऱ्या उतारात एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:२५ वाजण्याच्या सुमारास घडली. दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे रस्ता ओलांडून एसटी बसला धडक दिल्याने हा अपघात झाला असून, यामध्ये दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले आहेत.
अपघाताचा घटनाक्रम आणि जखमींची माहिती
एसटी बस (क्र. एम एच १४ बी टी २५५९) चे चालक शांतीनाथ यशवंत हसबे हे बस घेऊन हातखंबाकडून रत्नागिरीच्या दिशेने रस्त्याच्या डाव्या बाजूने येत होते. यावेळी चांदसऱ्या खेडशी येथील उतारात डफळचोळवाडी खेडशी फाट्यावरून येणारे दुचाकीस्वार दिलीप सखाराम आंबेकर (वय ४३) यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी (क्र. एम एच ०८ बी एफ ८३५६) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालवली. त्यांनी रस्ता ओलांडून विरुद्ध दिशेला येत असताना एसटी बसच्या उजव्या बाजूच्या पुढील चाकाजवळ जोरात धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीस्वार दिलीप आंबेकर आणि त्यांच्या मागे बसलेले रंजन महादेव खापरे (रा. डफळचोळवाडी) हे दोघेही रस्त्यावर फेकेले गेले आणि त्यांना लहान-मोठ्या गंभीर दुखापती झाल्या आहेत.
पोलीस तपास आणि गुन्हा नोंद
याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवादार बाजीराव नारायण कदम (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकी चालक आरोपी दिलीप सखाराम आंबेकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २०/२०२६ नुसार नोंद केला आहे. २ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५:१३ वाजता या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 03-02-2026














