दापोली : तालुक्यातील हर्णे बाजारपेठेत पिसाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात सात ग्रामस्थ जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात जितेंद्र तबीब आणि नारायण पावसे यांना गंभीर दुखापत झाली असून इतर जखमींवर तातडीने उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. घटनेनंतर हर्णे बाजारपेठ व बंदर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका कुत्र्याने संबंधित बैलाच्या डाव्या मांडीवर तसेच तोंडावर चावे घेतले होते. त्यानंतर हा बैल पिसाळल्याचे निदर्शनास आले. मंगळवारी हर्णे बाजारपेठ आणि बंदर परिसरात बैलाने अचानक धुमाकूळ घालत नागरिकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. जोरात धावत तो नागरिकांना धडक देत आणि मारण्याचा प्रयत्न करत असल्याने बाजारात एकच गोंधळ उडाला. या प्रसंगी ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत मोठ्या दोरखंडाच्या साहाय्याने बैलाला शिताफीने पकडून बांधले. त्यानंतर दापोली येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने पाचारण करण्यात आले. पशुवैद्यकीय उपचारानंतर बैल शांत झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे तसेच संशयास्पद वर्तन करणाऱ्या जनावरांची तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 03/Feb/2026














