Ajit Pawar and Jay Pawar: अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांची व्हॉटसअॅप स्टेटसला भावूक पोस्ट; म्हणाले, वेळ थांबली असती तर..

Ajit Pawar and Jay Pawar: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आता पाच दिवस उलटून गेले आहेत. या काळात महाराष्ट्रात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अंतर्गत वर्तुळात वेगवान राजकीय घडामोडी घडल्यामुळे पवार कुटुंबीयांना दु:ख बाजूला सारुन लगेच मैदानात उतरावे लागले होते.

या दु:खातून सावरत असतानाच आता अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव जय पवार यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. जय पवार (Jay Pawar) यांनी आपल्या व्हॉटसअॅप स्टेटसला वडिलांसोबतचे दोन फोटो ठेवले आहेत. यासोबत जय पवार यांनी काही मजकूरही लिहला आहे. यामध्ये म्हटले आहे की, “तुमची खूप आठवण येतेय. डॅड काश वेळ थांबली असती, मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. मिसिंग यू अ लॉट डॅड!”, असे जय पवार यांनी म्हटले. जय पवार यांच्या या स्टेटसचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी बारामती येथे येत असताना 28 जानेवारीला त्यांच्या विमानाचा अपघात झाला होता. विमान धावपट्टीवर उतरताना कोसळले होते. यानंतर विमानाचा प्रचंड स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर मोठा आघात झाला होता. 29 जानेवारीला अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्याकडील उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांच्या मंत्रि‍पदीही सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांनी सोमवारी कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. यानंतर सुनेत्रा पवार पुन्हा बारामतीत परतल्या होत्या. सुनेत्रा पवार या मंगळवारी काटेवाडी येथे असणार आहेत. काटेवाडी येथील सहयोग या निवासस्थानी पवार कुटुंब दुपारी चार वाजेपर्यंत सांत्वनपर भेटी स्वीकारणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 03-02-2026