नांदेड | प्रतिनिधी : राजकारणाची हाव माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक भयंकर प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आला आहे. सरपंचपदाची निवडणूक लढवता यावी, यासाठी एका जन्मदात्या पित्याने आपल्या ७ वर्षांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या केली आहे. तेलंगणा राज्यातील एका कॅनॉलमध्ये मुलीला फेकून देऊन तिचा जीव घेणाऱ्या या पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी पांडुरंग कोंडामंगले (वय ३२) याने हे क्रूर कृत्य केले आहे. पांडुरंगचे बाऱ्हाळी येथे हेअर कटिंगचे दुकान आहे. तीन दिवसांपूर्वी ‘साहित्य खरेदीसाठी जात आहे’ असे पत्नीला सांगून तो आपली ७ वर्षांची मुलगी प्राची हिला सोबत घेऊन गेला. मात्र, त्यानंतर त्याने तिला तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरातील बोधन रोडवरील एका कॅनॉलमध्ये फेकून दिले आणि स्वतः एकटाच घरी परतला.
निवडणूक आणि ‘तिसरे अपत्य’ हाच हत्येचा उद्देश?
मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंगला तीन अपत्ये आहेत. महाराष्ट्रातील नियमानुसार, ज्या व्यक्तीला दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची (ग्रामपंचायत/सरपंच) निवडणूक लढवता येत नाही. पांडुरंगला आगामी निवडणुकीत सरपंचपदासाठी उभे राहायचे होते. मात्र, तिसरे अपत्य या निवडणुकीत अडसर ठरेल, या भीतीपोटी त्याने आपल्याच चिमुकलीचा काटा काढल्याची जोरदार चर्चा मुखेड तालुक्यात सुरू आहे.
तेलंगणा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कॅनॉलमध्ये एका बालिकेचा मृतदेह आढळल्यानंतर तेलंगणा पोलिसांनी तातडीने तपास चक्रं फिरवली. तपासाचे धागेदोरे मुखेडपर्यंत पोहोचले. संशय बळावल्याने ३० जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेडमध्ये येऊन पांडुरंगला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला.
विविध चर्चांना उधाण
पांडुरंगने हे कृत्य केवळ निवडणुकीसाठी केले की त्यामागे आर्थिक विवंचना होती, याचा अधिकृत तपास पोलीस करत आहेत. मात्र, परिसरातून मिळणाऱ्या माहितीनुसार, तो सरपंचपदासाठी तयारी करत होता आणि त्यासाठीच त्याने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
महत्वाची टिप: महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यानुसार, १२ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य असल्यास संबंधित व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते. याच नियमाचा धसका घेऊन हे कृत्य घडल्याचे बोलले जात आहे.
पोटच्या गोळ्याची अशा प्रकारे हत्या केल्याने संपूर्ण नांदेड जिल्हा सुन्न झाला आहे. अशा गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 03-02-2026














