रत्नागिरी : जिल्ह्यात सावकारांकडून १२ कोटी ७९ लाख ७३ हजारांचे कर्ज वाटप

रत्नागिरी : विविध व्यवसायासाठी किंवा शेतीच्या कामासाठी ऐनवेळी आर्थिक अडचण आल्यास सावकाराच्या दुकानाची पायरी चढावी लागते. गेल्या आर्थिक वर्षात (एप्रिल २०२३ ते मार्च २०२४) जिल्ह्यातील ६९ परवानाधारकांनी सुमारे १२ कोटी ७९ लाख ७३ हजार ७०० रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

सावकारांच्या कर्जापेक्षा बँकेच्या कर्जाचा हप्ता कमी असला तरी बँकेकडून कर्ज उचलताना भरमसाट कागदपत्रे सादर करताना कर्जदाराची दमछाक होते. एवढे करूनही ती बँक कर्जाचा पुरवठा करेलच याची शाश्वती नसते. त्या तुलनेत सावकारांकडील कर्जाचा व्याजदर अधिक असला तरी कागदपत्रांची कटकट नसते. जिल्ह्यात एकूण ६९ परवानाधारक सावकार खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी या चार तालुक्यांमध्ये आहेत. यांच्यामार्फत गेल्या आर्थिक वर्षात १२ कोटी ८० लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

सावकारांकडून कर्ज घेताना ते तारण कर्ज असेल तर शेतकऱ्यांसाठी दरसाल दरशेकडा ९ टक्के आणि विनतारण कर्ज १५ टक्के दराने देता येते तसेच इतरांसाठी तारण कर्ज १२ टक्के व्याजदर आणि विनतारण कर्ज १८ टक्के दराने देणे बंधनकारक आहे; मात्र, काही सावकार अगदी २१ टक्के दराने कर्ज देतात किंवा काही सावकार जबरदस्तीने वसुली करतात. अशांची तक्रार जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) किंवा पोलिसांकडे करता येते.

नागरिकांनी परवानाधारक सावकाराकडूनच कर्ज घ्यावे. निश्चित केलेल्या व्याजाच्या दरापेक्षा जास्त व्याज घेत असल्यास त्याची निर्भयपणे या कार्यालयाकडे तक्रार करावी. अशा सावकारांवर कायदेशीर कारवाई केली जाते. डॉ. सोपान शिंदे, जिल्हा उपनिबंधक (सहकार) रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 29/Oct/2024