“मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय”; भारत-अमेरिका करारावर देवेंद्र फडणवीसांचे ट्विट

Devendra Fadnavis on India US Deal tarrifs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत अनेक महिन्यांपासून रखडलेला व्यापार करार झाला असल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला.

या करारानुसार, भारतीय वस्तूंवर आकारला जाणारा ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ २५ टक्क्यांवरून १८ टक्के केला. या निर्णयाची माहिती ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली. भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधणे माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. ते माझ्या अत्यंत जवळच्या मित्रांपैकी एक आहेत, असे ट्रम्प यांनी म्हणाले. या मोठ्या निर्णयानंतर भारत-अमेरिका संबंधांमध्ये सुधारणा झाल्याचे बोलले जात आहे. राज्याचे मुख्य-मंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर मत व्यक्त केले आहे.

“मैत्रीचा एक नवीन अध्याय! भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे. जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य टॅरिफ दर मिळणार आहे. यातून भारत-अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नूतन आणि उत्साहवर्धक संधींचे द्वार खुले करेल आणि ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर अशी बाब ठरेल. महाराष्ट्र हे कायम निर्यातीत अग्रेसर असलेले राज्य आहे. त्यामुळे हा करार आपल्या राज्यातील व्यवसायासाठी नवे क्षितिज खुले करेल. डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल,” असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मैत्रीचा एक नवीन अध्याय!
भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेल्या मैत्री आणि परस्पर आदरातून, तसेच त्यांच्या विनंतीनुसार तत्काळ प्रभावाने अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करारावर सहमती झाली आहे. या करारानुसार अमेरिका रेसिप्रोकल शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्के इतके कमी करेल. त्याचप्रमाणे भारतही अमेरिकेविरुद्धचे आपले शुल्क आणि इतर अडथळे टप्प्याटप्प्याने शून्यापर्यंत कमी करण्याच्या दिशेने पुढे जाईल, असे ट्रम्प म्हणाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 03-02-2026