राजकारण बाजूला, माणुसकीची हाक! आगीच्या विळख्यात सापडलेल्या वृद्धेसाठी परेश सावंतांची वेळेविरुद्ध शर्यत

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जाकी मिऱ्या येथे लागलेल्या भीषण आगीत होरपळलेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. निवडणूक प्रचाराचा धामधूम बाजूला ठेवून या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी शिवसेना उमेदवार परेश सावंत आणि स्थानिक ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र नियतीला हे मान्य नव्हते. वनिता भिकाजी जाधव असे या मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जंगलातील आगीच्या विळख्यात सापडल्या वनिता जाधव

मिळालेल्या माहितीनुसार, २ फेब्रुवारी रोजी जाकी मिऱ्या येथील माळरानावरील जंगलात अचानक भीषण आग लागली होती. याच दरम्यान वनिता जाधव या घरासाठी लागणारी लाकडे गोळा करण्यासाठी त्या भागात गेल्या होत्या. आगीचा जोर इतका प्रचंड होता की, काही क्षणातच त्या आगीच्या वेढ्यात सापडल्या. आगीची तीव्रता जास्त असल्याने त्या गंभीररीत्या होरपळल्या आणि मदतीसाठी टाहो फोडू लागल्या.

जाधव कुटुंबाचे धाडस आणि ग्रामस्थांची मदत

वनिता जाधव यांचा ओरडण्याचा आवाज राकेश प्रभाकर जाधव यांच्या पत्नी भक्ती यांच्या कानी पडला. त्यांनी तातडीने ही माहिती राकेश यांना दिली. क्षणाचाही विलंब न लावता राकेश जाधव, भक्ती जाधव आणि त्यांची मुलगी दुर्वा यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वनिता यांना आगीतून बाहेर काढले आणि गौतम पवार यांच्या मदतीने चादरीतून घराजवळ आणले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना तातडीने रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले.

निवडणूक प्रचार सोडून परेश सावंत मदतीला धावले

या घटनेची माहिती मिळताच, साखरतर गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवणारे शिवसेनेचे उमेदवार परेश सावंत यांनी आपला निवडणूक प्रचार तात्काळ थांबवला आणि रुग्णालयात धाव घेतली. पालकमंत्र्यांचे रुग्णालय प्रतिनिधी सागर भिंगारे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी या महिलेला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्याची व्यवस्था केली. रुग्णाला वाचवण्यासाठी जे जे काही करणे शक्य होते, ते सर्व परेश सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

नियतीचा घाला

परेश सावंत आणि ग्रामस्थांनी वनिता जाधव यांचे प्राण वाचवण्यासाठी वेळेविरुद्ध शर्यत लावली होती. कोल्हापूर येथे हलवण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली होती, मात्र दुर्दैवाने या वृद्ध महिलेचा जीव वाचू शकला नाही. या घटनेमुळे संपूर्ण जाकी मिऱ्या परिसरात शोककळा पसरली असून, निवडणुकीच्या धामधुमीतही एका सर्वसामान्य महिलेसाठी धावून जाणाऱ्या परेश सावंत यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे.