चिपळूण : डेरवण युथ गेम्स २७ फेब्रुवारी पासून श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज ट्रस्ट आयोजित शिवजयंती निमित्त होणाऱ्या बाराव्या डेरवण युथ गेम्सचे ता. २७ फेब्रुवारी ते ता. ६ मार्च २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. डेरवण येथील क्रीडासंकुलात १९ खेळांच्या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. या स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, जिम्नेस्टिक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी, खो खो, लंगडी, मल्लखांब, योगा या वैयक्तिक खेळासह फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, या खेळांचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला वॉल क्लाइम्बिंग या साहसी खेळाबरोबरच यावर्षी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या स्केटिंग खेळाचीही स्पर्धा पाहण्यास मिळणार आहे.
भारतीय खेळ आणि ऑलिम्पिक खेळांचा संगम असणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील सात हजारापेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. यंदाही विजेत्यांना पदके, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. १२०० पदके, ११५ करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षीस रूपाने देण्यात येणार आहे. अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले आहे. विविध क्रीडा प्रकारात राज्यातील खेळाडूंचा चित्तथरारक खेळ या स्पर्धेनिमित्त पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.
या स्पर्धेत ८ वर्षाखालील ते १८ वर्षाखालील खेळाडू सहभागी होणार आहेत. २५ फेब्रुवारी पर्यंत नोंदणी सुरु राहणार असून ऑनलाईन नोंदणी www.svjctsportsacademy.com या वेबसाईटवर सुरु झाली आहे. स्पर्धेच्या नोंदणीसाठी ८२२६३९३०६/८८०५२२८९२२/९८५०८८३२८३/९३२५४४९२०१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 04/Feb/2026














