मुंबई/कोल्हापूर : महाराष्ट्र सरकारने मंदिर प्रशासनाच्या इतिहासात प्रथमच एक अत्यंत क्रांतिकारी आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मंदिरांतील धार्मिक विधी, उत्सव आणि पारंपरिक प्रथा योग्य पद्धतीने पार पडाव्यात यासाठी आता “धर्मशास्त्रीय मार्गदर्शक” (Theological Guide) हे नवे पद भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नुकताच शासन निर्णय (GR) जारी केला असून, कायदा व न्याय विभागानेही यास मान्यता दिली आहे.
आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
३,०६७ मंदिरांवर असणार देखरेख : हे नवीन पद ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’साठी तयार करण्यात आले आहे. या समितीच्या नियंत्रणाखाली कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील एकूण ३,०६७ मंदिरे येतात. नोव्हेंबर २०२३ मध्ये समितीने पाठवलेल्या प्रस्तावाला आता सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.
वेतनश्रेणी आणि जबाबदाऱ्या : या पदावर नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यासाठी २५,५०० ते ८१,१०० रुपयांची आकर्षक वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यावर खालील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या असतील:
- मंदिरांतील पूजा-पाठ, धार्मिक विधी आणि उत्सवांचे मार्गदर्शन व देखरेख करणे.
- पुजारी आणि पुरोहितांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
- पालखी सोहळे आणि रथोत्सव यांचे शिस्तबद्ध नियोजन करणे.
- प्राचीन शिलालेख, अभिलेख, धर्मग्रंथ आणि ऐतिहासिक नोंदींचा अभ्यास करणे.
- मूर्तींचे जतन, संवर्धन आणि वज्रलेपासारख्या पारंपरिक उपचारांबाबत तज्ज्ञ सल्ला देणे.
काय असेल शैक्षणिक पात्रता? या विशेष पदासाठी केवळ पदवी असून चालणार नाही, तर धार्मिक ज्ञानाचीही अट आहे:
- उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण असावा.
- संस्कृत भाषा, वेद, पुराणे, धर्मशास्त्र आणि यज्ञकर्म यांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.
- गर्भाधान, जातकर्म, नामकरण यांसारख्या ‘षोडश संस्कारांची’ माहिती अनिवार्य आहे.
- राज्य सरकारमान्य वैदिक पाठशाळेचे प्रमाणपत्र किंवा संबंधित पदवी असणे आवश्यक आहे.
देवस्थान समितीचे वाढते महत्त्व : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन मंडळ हे सुमारे २५ हजार एकर मंदिर जमिनीचे व्यवस्थापन पाहते. रोख आणि वस्तुरूप देणग्यांचे नियंत्रण, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आणि जमिनींवरील अतिक्रमणे रोखणे अशी व्यापक जबाबदारी हे मंडळ पार पाडते. यापूर्वी २०१९ मध्ये समितीच्या विविध कार्यालयांसाठी ४१ पदांना मंजुरी देण्यात आली होती. सध्या या मंडळाचे अध्यक्षपद रिक्त असून सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आहे.














