Gold Silver Price On MCX: मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) आज, बुधवारी ४ फेब्रुवारी रोजी, सुरुवातीच्या व्यवहारात चांदीच्या किमतीत ६ टक्क्यांची वाढ झाली. सकाळच्या सुमारास एमसीएक्सवर सोन्याचा एप्रिलचा वायदा ४ टक्क्यांनी वधारून १,५९,८०१ रुपये प्रति १० ग्रॅम वर होता.
त्याच वेळी, चांदीचा मार्च वायदा ५.५ टक्क्यांनी वाढून २,८२,८१६ रुपये प्रति किलो वर पोहोचला. विक्रमी उच्चांकावरून घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदी सुरू केल्यानं ही तेजी पाहायला मिळत आहे.
मागील सत्रातील तेजी
मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी देखील बाजारात मोठी वाढ दिसून आली होती. एमसीएक्सवर चांदी ६ टक्क्यांनी वधारून २,८४,०९४ रुपये प्रति किलोवर पोहोचली होती, तर सोनं ३ टक्क्यांनी वाढून १,५८,४२० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. परकीय बाजारातही चांदी २.१ टक्क्यांनी वाढून ८६.९० डॉलरवर आणि सोने २.१ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते.
विक्रीच्या दबावानंतर बाजार सावरला
गेल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या विक्रीच्या दबावानंतर बुधवारी किमतींमध्ये सुधारणा दिसून आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतासोबत केलेल्या नवीन व्यापार कराराची घोषणा हे यामागील एक प्रमुख कारण मानलं जात आहे. या करारानुसार, अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील टॅरिफ ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे, तर भारतानं रशियन तेलाची खरेदी मर्यादित करण्यास आणि व्यापारातील अडथळे दूर करण्यास सहमती दर्शवली आहे.
तांत्रिक विश्लेषण आणि पुढील वाटचाल
विश्लेषकांच्या मते, चांदीचा भाव आता २,५३,४६८ रुपयांच्या महत्त्वपूर्ण तांत्रिक स्तरावर व्यवहार करत आहे. जर चांदीनं २,९२,९२८ रुपयांची पातळी ओलांडली, तर ही तेजी कायम राहू शकते आणि पुढील टार्गेट ३,४१,७७३ रुपये असू शकते. सोन्यासाठी १,५४,२१५ रुपयांवर तात्काळ रेझिस्टंस असून, हा स्तर पार केल्यास किंमत १,६०,००० ते १,६७,००० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
(टीप – यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 04-02-2026














