रत्नागिरी : कोकणच्या किनारपट्टीवर यंदा अस्मानी संकट ओढवले असून अरबी समुद्रात उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या थंड वाऱ्यांच्या लहरींमुळे खोल समुद्रातील पाणी कमालीचे गारठले आहे. या नैसर्गिक बदलामुळे समुद्रातील मासळी पूर्णपणे गायब झाली असून जिल्ह्यावर जणू ‘मत्स्यदुष्काळ’ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे ३०० हून अधिक बोटींना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागल्याने मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
एका ट्रिपचा खर्च साडेतीन लाख, पण हाती शून्य मासळी
सध्या समुद्रात मासेमारीसाठी जाणे म्हणजे एक मोठा जुगार ठरत आहे. एका मच्छीमार बोटीच्या सहा दिवसांच्या ट्रिपचा आर्थिक ताळेबंद थक्क करणारा आहे. साधारणपणे एका खेपेसाठी ३ लाख रुपयांचे डिझेल, २५ हजार रुपयांचा बर्फ आणि १७ कर्मचाऱ्यांचे रेशन व पाणी मिळून सुमारे साडेतीन लाख रुपयांहून अधिक खर्च होतो. इतकी मोठी गुंतवणूक करूनही मासळी मिळत नसल्याने मच्छीमार हतबल झाले आहेत. काही धाडसी मच्छीमारांनी मासळीच्या आशेने समुद्रातील मुक्काम १२ दिवसांपर्यंत वाढवला, मात्र रेशन आणि डिझेल संपत आल्याने अखेर रिकाम्या बोटी किनाऱ्याला लावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
स्थानिक बाजारपेठा ओस; विक्रेत्या भगिनींसमोर रोजगाराचा प्रश्न
या नैसर्गिक संकटाचे पडसाद केवळ समुद्रातच नव्हे तर स्थानिक मासळी बाजारातही उमटत आहेत. मासळीची आवक कमालीची घटल्याने रत्नागिरीसह जिल्ह्यातील इतर ठिकाणची मासळी मार्केट ओस पडू लागली आहेत. “विक्रीसाठी मासळीच उपलब्ध नसेल तर आम्ही कुटुंबाचा गाडा कसा ओढायचा?” असा आर्त सवाल मासळी विक्रेत्या भगिनी करत आहेत. मासळीच्या तुटवड्यामुळे दर गगनाला भिडले असून सामान्य ग्राहकांच्या ताटातूनही मासे गायब झाले आहेत.
मत्स्यदुष्काळ जाहीर करून मदतीची मागणी
समुद्रातील तापमानात झालेल्या बदलामुळे मासळी किनाऱ्याजवळ येणे बंद झाले आहे. ज्या बोटींना थोडीफार मासळी मिळाली, त्यांचे उत्पन्न डिझेलच्या खर्चाच्या १० टक्केही भरत नसल्याचे विदारक चित्र आहे. अरबी समुद्रातील हे शीतलहरींचे संकट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या परिस्थितीत मच्छीमार पूर्णपणे मेटाकुटीस आला असून, सरकारने याकडे ‘मत्स्यदुष्काळ’ म्हणून पाहावे आणि पीडित मच्छीमार कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.














