नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड केली जाईल. मात्र, अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही, असे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
नवी दिल्लीच्या साऊथ एवेन्यू येथील रा.काँ.च्या कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अध्यक्षपदाचा निर्णयही लवकर घेतला जाईल. रा.काँ.ची धुरा एका योग्य व्यक्तीच्या हाती दिली जाईल. परंतु मी या शर्यतीत नाही. पक्षात शोकाचे वातावरण आहे. जे नेते आमच्या पक्षातही नाहीत ते आमच्या पक्षाच्या भूमिकेवर उलटसुलट प्रश्न उपस्थित करीत आहेत. उपमुख्यमंत्री पद जास्त काळ रिक्त राहू शकत नाही म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली असल्याचेही ते म्हणाले.
पक्षाला योग्य दिशा दाखविण्याची गरज
पटेल म्हणाले की, मी अजितदादांसोबत अनेक वर्षे काम केले आहे. पक्षाध्यक्ष पदाचा निर्णयही आपल्याला घ्यायचा आहे. येत्या काळात ती प्रक्रिया पूर्ण होईल. मी कार्याध्यक्ष आहे. यामुळे पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. आमच्या पक्षात कोणाला अध्यक्ष बनवावे, कोणाला अध्यक्ष बनवू नये यावर बाहेरचे लोक चर्चा करत आहेत. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असा हा प्रकार आहे. सध्या पक्षाला योग्य दिशा दाखविण्याची गरज आहे, असेही पटेल म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:44 05-02-2026














