WPL 2026 Final: दोन जीवलग मैत्रीणीत रंगणार महाअंतिम सामना! स्मृती इतिहास रचणार की जेमी बदला घेणार? वाचा संपूर्ण तपशील

वडोदरा: महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ च्या जेतेपदासाठी आज दोन तगडे संघ समोरासमोर ठाकणार आहेत. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात ही ‘महाफायनल’ रंगणार आहे. मैदानाबाहेर स्मृती आणि जेमी यांच्यातील मैत्री जगजाहीर असली, तरी आज मैदानात ट्रॉफीसाठी या दोन मैत्रिणींमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.

RCB vs DC: २०२४ च्या फायनलची पुनरावृत्ती

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील ही दुसरी फायनल आहे. याआधी २०२४ मध्ये स्मृती मंधानाने मेग लेनिंगच्या दिल्लीला पराभूत करून आरसीबीला पहिले ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले होते. आता पुन्हा एकदा आरसीबीकडे सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावून इतिहास रचण्याची संधी आहे. तर दुसरीकडे, दिल्लीचा संघ जेमीच्या नेतृत्वाखाली मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

जेमिमा तोडणार का उपविजेतेपदाचा शाप?

दिल्ली कॅपिटल्ससाठी फायनल गाठणे ही जणू सवयच झाली आहे. २०२३ पासून सलग चार वेळा दिल्लीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र, दुर्दैवाने मागील तिन्ही वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यंदा मेग लेनिंगच्या जागी जेमिमा रॉड्रिग्ज ही संघाची सर्वात युवा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे जेमी दिल्लीला त्यांची पहिली ट्रॉफी मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सामना कधी आणि कुठे? (Match Details)

क्रिकेट चाहत्यांसाठी या हाय-व्होल्टेज सामन्याचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे आहे:

  • तारीख: गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६
  • वेळ: सायंकाळी ७:३० वाजता (भारतीय वेळ)
  • ठिकाण: कोटाम्बी स्टेडियम, बडोदा क्रिकेट असोसिएशन (BCA), वडोदरा.
  • थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (TV) आणि जिओहॉटस्टार (App & Website).

दोन्ही संघांचे संभाव्य ११ शिलेदार (Predicted Playing XI)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB): स्मृती मंधाना (कर्णधार), ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वोल, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, नादिन डी क्लर्क, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, सायली सातघरे, अरुंधती रेड्डी/प्रेमा रावत, लॉरेन बेल.

दिल्ली कॅपिटल्स (DC): शेफाली वर्मा, लिझेल ली (यष्टीरक्षक), लॉरा वोल्वार्ड्ट, जेमिमाह रोड्रिग्ज (कर्णधार), मॅरिझान कॅप, चिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, नंदिनी शर्मा, एन. श्री चरणी.

पीच रिपोर्ट: फिरकीपटूंना मिळू शकते मदत

वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर आतापर्यंतचा ट्रेंड पाहता, पाठलाग (Chasing) करणाऱ्या संघाला फायदा मिळताना दिसत आहे. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असली तरी, सामन्याच्या मध्यंतरात फिरकीपटू आपली जादू दाखवू शकतात. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:47 05-02-2026