नवी दिल्ली: विरोधी पक्षाला निवडणुकांमध्ये सलग होत असलेले पराभव पचविता येत नाहीत. माझ्याविषयी तीव्र द्वेष बाळगूनही काँग्रेस कधीही माझी कबर खोदू शकणार नाही, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत केला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या ठरावाला -दिलेल्या उत्तरात ते म्हणाले की, लोकसभेत विरोधकांनी केलेला गदारोळ हा केवळ भारताच्या आदिवासी समुदायातील महिला राष्ट्रपतींचाच नव्हे, तर त्या भूषवत असलेल्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा आणि भारतीय संविधानाचाही अपमान आहे, अशी टीका मोदी यांनी केली.
१०० मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी योजनांच्या अंमलबजावणीबाबत व ‘विकसित भारत’बाबत विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. भारत आता ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज बनला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्याविषयी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या ‘देशद्रोही’ या टिप्पणीचाही पंतप्रधानांनी निषेध केला. गांधी यांचे उद्गार हे संपूर्ण शीख समुदायाचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले. प. बंगालबद्दल मोदी म्हणाले की, तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकार पश्चिम बंगालमध्ये घुसखोरांचे संरक्षण करत आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मोहब्बत की दुकान’ची भाषा करणारेच ‘मोदी तेरी कबर खुदेगी’ अशा घोषणा देत आहेत. हा पक्ष कधीही माझी कबर खोदू शकणार नाही. माझ्यासारखा गरीब वर्गातील माणूस पंतप्रधानपदापर्यंत कसा पोहोचला आणि अजून टिकून कसा आहे, या गोष्टी विरोधी पक्षांना पचनी पडत नाहीत. काँग्रेसमधील एका परिवाराला पंतप्रधानपद हे त्यांची जहागिरी असल्यासारखे वाटते.
सरकारने २५ कोटी गरीब कुटुंबांना दारिद्र्याच्या खाईतून बाहेर काढले. आजवर कधीही वीज न पाहिलेल्या १८ हजार गावांमध्ये वीज पोहोचवण्यात आली. हीच कामे केल्यामुळे का त्यांना ‘मोदीची कबर खोदू’ असे वाटते का? सरकारने देशाच्या सैनिकांसाठी तिजोरी उघडली. याच निर्णयांमुळे विरोधकांकडून कबर खोदण्याची भाषा वापरली जात आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
भारताची ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’ वेगात, ती ध्येय गाठेल
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षांतील आपल्या सरकारच्या कामगिरीचा गुरुवारी राज्यसभेत केलेल्या भाषणात आढावा घेतला. ते म्हणाले की, उच्च आर्थिक विकासदर आणि कमी महागाई ही देशाच्या अर्थव्यवस्थेची ताकद दर्शवते. भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे.
– युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबत झालेल्या अलीकडील व्यापार करारांचाही त्यांनी उल्लेख केला आणि या घडामोडींनंतर जगाला भारतातील स्थैर्याबाबत अधिक आत्मविश्वास वाटत असल्याचे सांगितले. भारताची ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’ वेगात असून तो २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे ध्येय नक्की साध्य करेल.
– भारत आता ‘ग्लोबल साऊथ’चा मजबूत आवाज बनला आहे.देशातील कोट्यवधी माता-भगिनी आणि गरीबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने विरोधक कधीही यशस्वी होणार नाहीत, असे मोदी यांनी नमूद केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 06-02-2026













