सोलापूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव दिले तर आम्हाला त्याचा आनंदचं आहे, असं म्हटलं आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं नाव अजितदादांची लाडकी बहीण योजना असं नाव देण्याची मागणी केली होती.
आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील याबाबत वक्तव्य केलं आहे. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी क्लीन चीट देऊन मोकळे होऊ नका, अपघाताची सखोल चौकशी करा, असं सपकाळ म्हणाले.
Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी या पद्धतीने पार्थ पवार यांना क्लीन चीट दिली आहे. तशीच अजित पवार विमान अपघात प्रकरणी कुठल्याही प्रकारची क्लीनचीट देऊन सरकारने मोकळे न होता त्या प्रकरणाची चौकशी करावी. अपघातप्रकरणी संशय घोंगावत आहे. त्यामुळे अजित पवारांसारखा लोकनेता गेल्यावर त्यांची पारदर्शकपणे सखोल चौकशी व्हावी, अशी आपली मागणी असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायम सुरू ठेवणार की नाही याबाबतचा खुलासा राज्य सरकारने करावा. लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 रुपये कधी देणार हे त्यांनी सांगावं. सत्ता भाजपची आहे, त्यामुळे अजित पवारांचं नाव त्यांनी लाडकी बहीण योजनेला दिले तर आम्हाला त्याचा आनंद आहे,असेही यावेळी प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले.
सन 1999 सालापासून काँग्रेस आघाडी करून लढत आहे. त्यामुळे काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेतली. आगामी काळातही काँग्रेस इंडिया अलायन्स सोबत चर्चा करून स्वबळाबाबत निर्णय घेऊ शकते, असेही सपकाळ यांनी म्हटलं.
दरम्यान, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीचा प्रचार आज संपणार असून येत्या 7 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणी 9 फेब्रुवारीला होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 06-02-2026














