Zilla Parishad Election 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातील ‘मिनी विधानसभा’ समजल्या जाणाऱ्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेल्या शोककळेमुळे या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे.

निवडणुकीच्या तारखेत का झाला बदल?

राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी मतदानाची तारीख निश्चित केली होती. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने राज्यात तीन दिवसांचा सरकारी दुखवटा जाहीर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन आयोगाने मतदानाची तारीख बदलून ती 7 फेब्रुवारी केली, तर मतमोजणी आता 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे.


निवडणुकीची महत्त्वाची आकडेवारी

या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून रिंगणात उमेदवारांची मोठी गर्दी आहे:

  • एकूण जागा: 731 जिल्हा परिषद गट आणि 1,462 पंचायत समिती गण.
  • एकूण उमेदवार: 7,438 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
  • विभाजन: जिल्हा परिषदेसाठी 2,624 तर पंचायत समितीसाठी 4,814 उमेदवार मैदानात आहेत.
  • मतदान वेळ: सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत.

‘या’ 12 जिल्ह्यांमध्ये पार पडतेय मतदान

निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, खालील जिल्ह्यांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया सुरू आहे:

  1. रायगड 2. रत्नागिरी 3. सिंधुदुर्ग 4. पुणे 5. सातारा 6. सांगली 7. सोलापूर 8. कोल्हापूर 9. छत्रपती संभाजीनगर 10. परभणी 11. धाराशिव 12. लातूर.

महत्त्वाची टीप: मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित 12 जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.



निकालाकडे सर्वांचे लक्ष

आज मतदान पार पडल्यानंतर सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत (EVM) कैद होईल. त्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत राज्यातील 12 जिल्ह्यांच्या ग्रामीण भागावर कोणाचे वर्चस्व राहणार, हे स्पष्ट होईल. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला असून शांततेत मतदान करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 07-02-2026