मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय आणि ‘बिग बॉस मराठी ३’चा विजेता विशाल निकम (Vishal Nikam) याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या गुपित प्रेमामुळे चर्चेत असलेल्या विशालने अखेर त्याची ‘अर्धांगिनी’ जगासमोर आणली असून, ८ फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात त्याचा साखरपुडा संपन्न झाला आहे.
ऑनस्क्रीन जोडी आता रिअल लाईफमध्ये!
विशाल निकमची होणारी पत्नी दुसरी कोणी नसून लोकप्रिय अभिनेत्री अक्षया हिंदळकर (Akshaya Hindalkar) आहे. स्टार प्रवाहवरील ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत विशाल आणि अक्षयाने एकत्र काम केले होते. या मालिकेतून सुरू झालेली त्यांची ही ऑनस्क्रीन केमिस्ट्री आता खऱ्या आयुष्यात कायमस्वरूपी नात्यात बदलली आहे.
सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर करताना विशालने एक भावूक कॅप्शनही दिले आहे. तो म्हणतो, “देव खरंच माझ्या बाजूने होता जेव्हा त्याने तुला माझ्यासाठी लिहिलं…” या फोटोंमध्ये ही जोडी पारंपरिक वेशात अत्यंत खुलून दिसत आहे. विशालच्या या पोस्टवर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांसह त्याच्या लाखो चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
विशाल निकमचा आतापर्यंतचा प्रवास:
- दख्खनचा राजा जोतिबा: या मालिकेतून विशालला घराघरात प्रसिद्धी मिळाली.
- बिग बॉस मराठी ३: या शोमध्ये विशालने आपल्या दमदार खेळीने विजेतेपद पटकावले.
- येड लागलं प्रेमाचं: सध्या तो या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.












