राजापूर: ग्रामीण राजकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने राजापूर तालुक्यात अभूतपूर्व विजय मिळवला आहे. विरोधकांचा पूर्णपणे धुव्वा उडवत शिवसेनेने तालुक्यात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून ठाकरे सेना आणि काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही. जिल्हा परिषदेच्या सर्व ६ जागांवर शिवसेनेने बाजी मारली आहे, तर पंचायत समितीच्या १० जागांवर भगवा फडकवला आहे.
विखारेगोठणे येथे रंगली मतमोजणीची चुरस
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जस्मिन यांच्या मार्गदर्शनाखाली विखारेगोठणे येथील मराठे महाविद्यालयामध्ये आज मतमोजणी पार पडली. पहिल्या फेरीपासूनच शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. विजयाची खात्री पटताच शिवसेना कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार किरण सामंत यांनी विजयी उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
जिल्हा परिषद: दिग्गजांना धूळ चारत शिवसेनेची ‘क्लीन स्वीप’
जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या उमेदवारांनी वर्चस्व राखले:
- वडदहसोळ गट: शिवसेनेचे प्रतीक मटकर यांनी ठाकरे गटाच्या राजेश चव्हाण यांचा पराभव केला.
- तळवाडे गट: सिद्धाली मोरे यांनी ठाकरे सेनेच्या समिक्षा चव्हाण यांना धूळ चारली.
- जुवाठी गट: रमेश सूद यांनी माजी जि.प. सदस्य दिनेश जैतापकर यांचा पराभव केला.
- धोपेश्वर गट: माजी सभापतींच्या लढतीत शिवसेनेचे प्रकाश कुवळेकर यांनी अभिजित तेली (ठाकरे सेना) यांचा पराभव केला.
- साखरीनाटे गट: कोमल नवाळे यांनी नलिनी शेलार यांचा पराभव केला.
- कातळी गट: सोनाली ठुकरूल यांनी माजी जि.प. सदस्य लक्ष्मी शिवलकर यांचा पराभव करत विजय संपादन केला.
पंचायत समिती: १० जागांवर शिवसेनेचे वर्चस्व, भाजपला एक जागा
पंचायत समितीच्या १२ गणांपैकी १० जागांवर शिवसेनेने विजय मिळवला, तर एका जागेवर भाजप आणि एका जागेवर अपक्षाने बाजी मारली:
- शिवसेना विजयी उमेदवार: गौतम जाधव (वडदहसोळ), उमेश पराडकर (रायपाटण), अपेक्षा मासये (तळवडे), समिक्षा वाफेलकर (ताम्हाणे), भाग्यश्री लाड (केळवली), प्रसाद मोहरकर (जुवाठी), राजेश गुरव (पेंडखळे), स्पृहा गुरव (साखरीनाटे), जान्हवी गावकर (अणसुरे) आणि पंढरीनाथ मयेकर (कातळी).
- भाजप: धोपेश्वर गणामध्ये अभिजित गुरव यांनी एकमेव जागा जिंकली.
- अपक्ष: नाटे गणामध्ये नंदिनी कदम यांनी भाजपच्या सुवर्णा बांदकर यांचा पराभव करून विजय मिळवला.
या निवडणुकीच्या निकालाने राजापूर तालुक्यात आमदार किरण सामंत यांची पकड अधिक मजबूत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.














