12th Board Exam: राज्यात 15 लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीची परीक्षा मंगळवार १० फेब्रुवारी ते बुधवार १८ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ३२ बत्तीस हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८ लाख २० हजार २२९ मुले, ७ लाख १२ हजार २४० मुली व १८ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १० हजार ६६४ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३ हजार ३८७ मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

प्रचलित पध्दतीप्रमाणे ‘माहिती तंत्रज्ञान’ व ‘सामान्य ज्ञान’ या दोन विषयांची परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाणार असून माहिती तंत्रज्ञान या विषयासाठी एकूण २ लाख ३६ हजार ३२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे व सामान्य ज्ञान या विषयासाठी एकूण १ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आवेदनपत्रे स्विकारण्यात आलेली आहेत. परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरुन समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

राज्य मंडळ व ९ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करुन हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगइन मध्ये ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉ‍ल तिकीट) उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेसाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत गाडया नियमित व वेळेत सोडणेबाबत येणार असून परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने अखंडीत विद्युत पुरवठा करावयाचा आहे. मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय/अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन व तत्सम परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर १२ मार्च ते १४ मार्च २०२६ रोजी आऊट ऑफ टर्न ने आयोजित करण्यात आलेली आहे.
परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहे. मंडळ सदस्य आणि जिल्हास्तरीय शासकीय अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्याकरीता ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही उपलब्ध आहेत तेथे परीक्षा कॅमेराबध्द घेण्यात येतील. ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षेशी निगडीत स्टाफ कडून गैरप्रकार झाला असेल अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या कार्यनिश्चीतीनुसार संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:00 10-02-2026