Ratnagiri : शाळा, महाविद्यालयांना ११ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी

रत्नागिरी : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २८ ऑक्टोबरपासून दिवाळीची सुटी पडली आहे. दिवाळी सुटीनंतर शाळांमध्ये दुसरे सत्र सुरू होणार आहे. हे सत्र १२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. काही शाळांनी मात्र शासनाच्या परिपत्रकापेक्षा सुट्या कमी केल्या आहेत.

काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा नाताळची आठ ते दहा दिवस सुटी देत असल्यामुळे त्यांनी दिवाळीची सुटी कमी करून नाताळसाठी नियोजन केले आहे. पूर्वी या शाळा गणेशोत्सवाची एक ते दोन दिवस सुटी देत होत्या; परंतु पालकांच्या मागणीनुसार शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार आठ ते दहा दिवस सुटी देत आहेत; मात्र अध्यापनाचे तास भरून काढण्यासाठी सुट्यांच्या नियोजनात काही बदल करण्यात आला आहे.

२८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर अशी सुटी असून, ५ नोव्हेंबरला खासगी शाळा सुरू होणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिवाळी सुटी २८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर अशी आठ दिवस देण्यात आली होती. या कालावधीत ३१ ऑक्टोबरला नरक चतुर्दशीनिमित्त जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुटी घोषित केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शालेय कामकाजाचे सात दिवस सुटी होत आहे. त्यामुळे गणपती सुटीतील शिल्लक एक दिवस व दिवाळी सुटीतील एक दिवस अशी दोन दिवसांची सुटी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे २८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर अशी नऊ दिवस सुटी देण्यात आली आहे. १० ला रविवार आहे. सोमवार ११ पासून द्वितीय सत्राची सुरवात होणार आहे. प्राथमिक शाळांना २८ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत सुटी आहे. १३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. माध्यमिक शाळांपेक्षा प्राथमिक शाळांना सुट्या दोन दिवस जास्त आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 30-10-2024