रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘आयुष’ (AYUSH) विभागाचा कारभार सध्या पूर्णपणे रामभरोसे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या विभागातील युनानी औषधांचा साठा पूर्णपणे संपला असून, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. एकीकडे सरकार पर्यायी औषधोपचार पद्धतीला प्रोत्साहन देण्याच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र औषधांअभावी रुग्णांची मोठी ससेहोलपट होत आहे.
रुग्णांचे हाल आणि आर्थिक भुर्दंड
या विभागात दररोज सरासरी १० ते १५ रुग्ण मोठ्या आशेने उपचारासाठी येतात. युनानी तज्ज्ञ डॉक्टर देखील दररोज बाह्य रुग्ण विभागात (OPD) वेळेवर उपस्थित राहतात, मात्र औषधे उपलब्ध नसल्याने ते केवळ तपासणी करून सल्ला देण्यापलीकडे काहीही करू शकत नाहीत. विशेष म्हणजे, युनानी औषधे ही सहजासहजी खाजगी मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे ‘औषधे आणायची कुठून?’ असा संतप्त सवाल रुग्ण विचारत आहेत. ग्रामीण भागातून भाडे खर्च करून शहरात येणाऱ्या गरीब रुग्णांना यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
प्रशासकीय दिरंगाई आणि आरोग्य विभागाचे अपयश
या विदारक परिस्थितीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, युनानी औषधांचा पुरवठा थेट राज्य स्तरावरून केला जातो. सध्याचा साठा संपला असून नवीन पुरवठा अद्याप झालेला नाही. राज्य स्तरावरून औषधे प्राप्त होताच ती तातडीने रुग्णांना उपलब्ध करून दिली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र, सलग १८० दिवसांपासून औषधे उपलब्ध नसणे हे आरोग्य विभागाचे मोठे अपयश मानले जात असून, वरिष्ठ अधिकारी याकडे केव्हा लक्ष देणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 11-02-2026














