शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने एनडीएमध्ये सहभागी व्हावे : रामदास आठवले

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

शरद पवार यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यामुळे आठवले यांनी मंगळवारी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारांचा गट महायुतीमध्ये अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये समाविष्ट व्हावे. असे झाल्यास आम्हाला आनंदच होईल. सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिपदासकट सर्व अटींवर सकारात्मक प्रतिक्रिया उमटतील, असेही आठवले यांनी नमूद केले.

पवार साहेबांची प्रकृती सध्या चांगली आहे. हॉस्पिटलमध्ये असून देखील त्यांनी लोकसभा चालू आहे का विचारलं, त्यावर मी त्यांना लोकसभा चालू नाही. मात्र राज्यसभा चालू असल्याचे सांगितले. पवार यांची विल पॉवर खूप चांगली आहे. त्यामुळे ते लवकरच बरे होतील, असा विश्वासही आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 11-02-2026