रत्नागिरी: कोकणातील जनजीवन आपल्या सिद्धहस्त लेखणीने सातासमुद्रापार नेणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘कोमसाप’चे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे हा सुवर्णक्षण रंगणार आहे.
साहित्य संकल्पकाचा सन्मान आणि प्रकट मुलाखत
मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा सोहळा होत आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची ‘प्रकट मुलाखत’. त्यांच्या समृद्ध अनुभव विश्वावर आधारित ही मुलाखत नमिता कीर, प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, अशोक बागवे, अरुण म्हात्रे आणि अभिजित हेगशेट्ये घेणार असून, यातून मधुभाईंचा साहित्यिक प्रवास उलगडला जाणार आहे.
या सोहळ्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे:
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मधुभाईंचा नागरी सत्कार संपन्न होईल.
- अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आणि नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
- कोकणातील सात जिल्ह्यांतील लेखकांनी लिहिलेल्या ‘गौरव अंकाचे’ प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते केले जाईल.
नव्या पिढीसाठी हक्काचे व्यासपीठ: ‘कोमसाप’चा प्रवास
पत्रकार परिषदेत बोलताना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी मधुभाईंच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, “मधुभाईंनी साहित्याच्या पलीकडे जाऊन संस्थात्मक बांधणी केली आहे. त्यांनी उभी केलेली ‘कोमसाप’ आज महाराष्ट्राची अस्मिता आहे”. १९६० च्या दशकात मालगुंड येथे कवी केशवसुतांचे स्मारक उभारण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि एका सामान्य कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास हा नव्या लेखकांसाठी प्रेरणादायी आहे.
रत्नागिरीकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन
रत्नागिरी ही मधुभाईंची कर्मभूमी असल्याने त्यांनी या वयातही येथे सत्कार स्वीकारण्यास पसंती दिली आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, नमिता कीर, प्रा. प्रदीप ढवळ आणि गजानन पाटील यांनी रत्नागिरीतील रसिक, तरुण लेखक आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सुकाणू समितीचे सदस्य आणि ‘कोमसाप’चे पदाधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून नामदार उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेत आहेत.














