रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेतील विविध घोटाळ्यांची प्रकरणे ताजी असतानाच आता पालिकेच्या अवाढव्य खर्चाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेकडून होणारा खर्च उत्पन्नाच्या तुलनेत कैक पटीने जास्त असल्याचे समोर आले आहे. एकीकडे नगरपालिका आर्थिक संकटाचा सामना करत असताना देखभालीच्या नावाखाली होणारा हा खर्च आता चर्चेचा विषय ठरला आहे.
खर्चाचा आकडा उत्पन्नापेक्षा तिप्पट
नगरपालिकेच्या मालमत्ता विभागातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षी केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत नाट्यगृहाच्या देखभालीसाठी ३१ लाख ७३ हजार ४७३ रुपये खर्च करण्यात आले. याचा हिशोब केल्यास दरमहा सुमारे ५ लाख ३३ हजार रुपये खर्च केले जातात. धक्कादायक बाब म्हणजे, याच कालावधीत नाट्यगृहाच्या माध्यमातून नगरपालिकेला केवळ १४ लाख ९५ हजार १७३ रुपये इतकेच उत्पन्न मिळाले आहे. म्हणजेच, महिन्याला सव्वा लाखाचे उत्पन्न मिळवणाऱ्या नाट्यगृहावर साडेपाच लाख रुपये खर्च केले जात आहेत.
वार्षिक ६३ लाखांचा अवाढव्य भुर्दंड
नाट्यगृहाच्या देखभालीसाठी वर्षाकाठी सुमारे ६३ लाख ४६ हजार रुपये इतका भरमसाठ खर्च होतो. देखभालीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून होणारी ही पैशांची उधळण पाहून सामान्य नागरिक अवाक झाले आहेत. रत्नागिरी नगरपालिका सध्या सुमारे ३५ कोटी रुपयांच्या देण्याच्या ओझ्याखाली असताना अशा प्रकारे अकार्यक्षम खर्च करणे पालिकेच्या आर्थिक आरोग्यासाठी घातक असल्याचे बोलले जात आहे.
आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचे आव्हान
सध्या नगरपालिका आर्थिक अडचणीत असून विविध विकासकामांसाठी निधीची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत नाट्यगृहासारख्या प्रकल्पांवर होणारा अवाढव्य खर्च प्रशासनाने कमी करणे आवश्यक आहे. जर हे भरमसाठ खर्च टाळले किंवा त्यावर नियंत्रण मिळवले, तरच नगरपालिका आर्थिक संकटातून बाहेर पडू शकते, अशी प्रतिक्रिया शहरातील जाणकार नागरिकांकडून व्यक्त होत आहे.














