चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
यात गोवळकोट येथील शेखर गंगाराम निकम व सावर्डे प्रशांत भगवान यादव या दोघा अपक्षांचा समावेश आहे. प्रमुख दोन्ही उमेदवारांच्या नावाशी ही दोन्ही नावे मिळतीजुळती आहेत. मतविभागणी होण्यासाठी दोन्ही पक्षांकडून ही करामत झाल्याची चर्चा चिपळूण मतदारसंघात सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार शेखर गोविंदराव निकम यांनी महायुतीतर्फे अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर त्यांच्या नावाशी मिळतेजुळते असलेले गोवळकोट येथील शेखर गंगाराम निकम यांनी अपक्ष म्हणून मंगळवारी उमेदवारी दाखल केली. गेले काही दिवस शेखर गंगाराम निकम हे येथे नागरिकांना दिसले नव्हते. त्यामुळे ते उमेदवारी दाखल करण्याची शक्यता होती. अखेरच्या क्षणी त्यांनी उमेदवारी दाखल करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून प्रशांत बबन यादव यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे; मात्र त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या सावर्डे येथील प्रशांत भगवान यादव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.
प्रमुख उमेदवारांच्या मतांची विभागणी होण्यासाठी दोन्ही गटाकडून ही खेळी केली गेल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही उमेदवार माघारी घेणार की निवडणूक रिंगणात राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 30/Oct/2024














