रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा सहकारी आंबा उत्पादक संघामार्फत १० फेब्रुवारी २०२६ रोजी ‘ड्रीप इरिगेशन आणि सघन आंबा लागवड’ या विषयावर एक विशेष कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना आणि प्रगत शेती अवजारांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे १५० हून अधिक शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी आमदार श्री. किरणजी सामंत यांचे विशेष सहकार्य लाभले.
आधुनिक सिंचन आणि खत नियोजनावर भर
जैन इरिगेशनचे श्री. गाडेकर यांनी ड्रीप इरिगेशनचे महत्त्व सांगतानाच, वर्षभर ड्रीपमधून खतांचे नियोजन (Fertigation) कसे करावे, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कोकणातील बदलत्या हवामानानुसार सघन आंबा लागवड (High-Density Plantation) कशी फायदेशीर ठरू शकते, यावर यावेळी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. किरण माळशे यांनी आंबा पिकातील तांत्रिक बाबी आणि कीड-रोग व्यवस्थापनावर शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
शेतीमध्ये AI आणि शासकीय ॲप्सचा वापर
जिल्हा कृषी अधिकारी श्री. सदाफुले यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करून तयार करण्यात आलेल्या शासकीय मोबाईल ॲपची माहिती देऊन, शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा कृषी कार्यालयाच्या विशेष सहकार्यामुळे ही कार्यशाळा अधिक माहितीपूर्ण ठरली.
व्यावसायिक तंत्रज्ञान आणि पॅकेजिंगचे प्रदर्शन
या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘श्राईन इसुझु’ यांनी शेतकऱ्यांच्या गरजांनुसार उपलब्ध असलेल्या गाड्यांची माहिती दिली. तसेच ‘वेदा प्लास्टिक’ने आंबा वाहतुकीसाठी लागणाऱ्या आधुनिक क्रेट्सचे प्रात्यक्षिक दाखवले. ‘राघव पॅकेजिंग’चे श्री. मराठे यांनी आंबा निर्यातीसाठी आणि स्थानिक विक्रीसाठी स्वस्त व दर्जेदार कोरुगेटेड बॉक्सचे नमुने शेतकऱ्यांसमोर सादर केले, ज्याला बागायतदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
सजग शेतकरी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमाची सुरुवात आंबा संघाचे प्रसन्न पेठे आणि अल्ताफ काझी यांनी स्वागत करून केली. ज्येष्ठ बागायतदार उदय पटवर्धन यांनी या वयातही नवीन तंत्रज्ञान शिकण्याची जिद्द दाखवत उपस्थित शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला. कार्यक्रमाची सांगता मंदार सरपोतदार यांनी आभार मानून केली. या कार्यशाळेमुळे रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना जागतिक दर्जाचे उत्पादन घेण्यास नवी दिशा मिळाली आहे.














