दापोली: झाडावरून पडून कारजगाव येथील वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू; रामफळ काढताना काळा दगड ठरला काळ

दापोली: दापोली तालुक्यातील कारजगाव जानेश्वरवाडी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घराशेजारील झाडावर चढून रामफळ काढत असताना फांदी तुटल्याने ६७ वर्षीय वृद्धाचा जमिनीवर पडून मृत्यू झाला. दत्ताराम जनार्दन नामोळे असे या दुर्दैवी मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे कारजगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.


नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास दत्ताराम नामोळे हे आपल्या घराच्या बाजूला असलेल्या रामफळाच्या झाडावर फळे काढण्यासाठी चढले होते. झाडावर असताना अचानक त्यांच्या पायाखाली असलेली फांदी तुटली आणि त्यांचा तोल गेला. खाली जमिनीवर असलेल्या काळ्या दगडावर ते जोरात आदळले. या भीषण अपघातात त्यांच्या कोपराला गंभीर दुखापत झाली आणि बरगडीला जोराचा मुका मार लागला.


उपचारादरम्यान मृत्यू

अपघात घडल्यानंतर जखमी दत्ताराम नामोळे यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. सुरुवातीला त्यांना बुरोंडी येथील डॉ. फहिम यांच्याकडे, त्यानंतर दापोलीतील तलाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना अखेर उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.


पोलीस तपास आणि गुन्हा नोंद

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दापोली पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक ११/२०२६ नुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) १९४ प्रमाणे या प्रकरणाची नोंद १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९:२६ वाजता करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.