चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या परशुराम घाटात एका ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे. सवतसडा वळणाजवळ भरधाव वेगातील ट्रेलरWelcome बोर्डच्या पोलला धडक देऊन तब्बल २० फूट खोल खड्ड्यात कोसळला. या अपघातात ट्रेलरचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. चिपळूण पोलिसांनी याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. राजस्थान येथील चालक श्रवनराम हुकमाराम बिश्नोई (वय ४६) हा आपल्या ताब्यातील ट्रेलर (क्रमांक GJ 27 X 8868) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. परशुराम घाट उतरत असताना, रस्ता वळणाचा आणि तीव्र उताराचा असूनही चालकाने गाडीचा वेग कमी केला नाही. बेदरकारपणे आणि हयगयीने वाहन चालवल्यामुळे सवतसडा वळणापाशी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला.
अनियंत्रित झालेला ट्रेलर प्रथम रस्त्यावरील वेलकम बोर्डच्या पोलला जोरात धडकला आणि त्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या २० फूट खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाला. या अपघातात ट्रेलरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चालक श्रवनराम बिश्नोई याला गंभीर दुखापत झाली आहे.
पोलीस तपास आणि गुन्हा नोंद
या अपघाताप्रकरणी सुशिल कुमार नंदराम शर्मा (वय ३५, रा. अहमदाबाद, गुजरात) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालक श्रवनराम हुकमाराम बिश्नोई याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(५) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १:५८ वाजता या गुन्ह्याची अधिकृत नोंद (गु.र.नं. ४४/२०२६) करण्यात आली असून, चिपळूण पोलीस अधिक तपास करत आहेत.














