संगमेश्वर: देवडे गावात दोन महिन्यांपासून रेशन पुरवठा ठप्प; रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभारावर ग्रामस्थ आक्रमक

देवरुख (१२ फेब्रुवारी): संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावातील रेशन धारकांना मागील दोन महिन्यांपासून रेशनचा पुरवठा करण्यात आला नसल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. रेशन दुकान चालवणारे लवेश कांगणे यांनी ग्रामस्थांना रेशन दिलेच नाही, असा गंभीर आरोप देवडे आणि वाडी आधीष्ठी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष दयानंद चिंचवलकर यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


नेमकी तक्रार आणि ग्रामस्थांचे आरोप

श्री. दयानंद चिंचवलकर यांनी रेशन दुकानदाराच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावात रेशन मिळत नसल्याने “आज देवडे गावातील रेशनधारक जगणार कसे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानदाराकडून ग्राहकांना उद्धट वागणूक दिली जाते. विशेषतः रेशन घेण्यासाठी येणाऱ्या वयस्कर व्यक्तींना तासनतास ताटकळत ठेवणे, वेळेचे कोणतेही बंधन न पाळणे आणि वेळेवर रेशन उपलब्ध न करून देणे, अशा तक्रारींचा पाढाच ग्रामस्थांनी वाचला आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, गावातील रेशनचे धान्य रात्रीच्या वेळी टेम्पोमध्ये भरून दुसरीकडे नेले जात असल्याची चर्चा संपूर्ण गावात रंगली आहे. यामुळे रेशनचा काळाबाजार होत असल्याचा संशय चिंचवलकर यांनी व्यक्त केला आहे.


प्रशासनाकडे कारवाईची मागणी

या गैरप्रकाराची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी आणि सखोल तपास करून संबंधित रेशन दुकानदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देवडे आणि वाडी आधीष्ठी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष दयानंद चिंचवलकर यांनी केली आहे. गरिबांच्या हक्काचे धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचावे यासाठी पुरवठा विभागाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.