चिपळूण: कोकणच्या राजकीय पटलावर सध्या चिपळूणच्या पंचायत समिती सत्तास्थापनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर आता खऱ्या अर्थाने सत्तेची जुळवाजुळव सुरू झाली असून, शिवसेना (उबाठा) नेते आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार शेखर निकम यांच्यातील ‘ती’ अनपेक्षित भेट आता राजकीय समीकरणांचा टर्निंग पॉईंट ठरणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
सुसंस्कृत भेटीतून सत्तेचा मार्ग प्रशस्त?
उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी दोन्ही नेते अनावधानाने आमनेसामने आले होते. राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे जाधव आणि निकम यांच्यात कोणतीही कटुता न दिसता अत्यंत सौजन्यपूर्ण संवाद झाला. त्यावेळी ही केवळ ‘औपचारिक भेट’ वाटली असली, तरी बदललेल्या निकालांनंतर आता हीच भेट ‘महाविकास आघाडी २.०’ किंवा नव्या स्थानिक समीकरणांची नांदी ठरू शकते.
संख्याबळ काय सांगते? (चिपळूण पंचायत समिती – एकूण १८ जागा)
चिपळूण पंचायत समितीमध्ये सत्तेचा पेच निर्माण झाला आहे, कारण कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही:
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ०७ जागा (सर्वात मोठा पक्ष)
- शिवसेना (उबाठा): ०४ जागा
- शिवसेना (शिंदे गट): ०४ जागा
- भाजप: ०३ जागा
बहुमतासाठी १० हा जादूई आकडा गाठणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीकडे ७ जागा असल्याने त्यांना सत्ता स्थापनेसाठी किमान ३ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे.
‘एकला चलो’ची भूमिका आणि अजितदादांच्या निधनाचे सावट
नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले होते. त्या अनुभवातून शिकत आमदार शेखर निकम यांनी यावेळी ‘एकला चलो’चा नारा दिला. प्रचाराच्या धामधुमीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे मोठे संकट कोसळले असतानाही, निकम यांनी संयम राखला. कोणतीही मोठी सभा न घेता ‘डोअर टू डोअर’ प्रचार करून त्यांनी ७ जागांवर विजय मिळवला, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होऊनही महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही.
उबाठा गटाचा पाठिंबा आणि नवी युती?
आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा) गटाने ४ जागा जिंकून आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, उबाठा गटाने राष्ट्रवादीच्या यशाचे कौतुक करत “राष्ट्रवादीचाच सभापती व्हावा” अशी सूचक भूमिका मांडली आहे. जुन्या कटू आठवणी पाहता शेखर निकम हे शिंदे गट किंवा भाजपसोबत जाण्याऐवजी भास्कर जाधव यांच्या उबाठा गटाशी हातमिळवणी करण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
चिपळूणकरांची उत्सुकता शिगेला
जर आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम हे दोन दिग्गज नेते एकत्र आले, तर चिपळूणच्या राजकारणात हा मोठा बदल ठरेल. ही नवी युती केवळ पंचायत समितीपुरती मर्यादित राहील की आगामी विधानसभा निवडणुकीची पायाभरणी असेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 12-02-2026














