Ratnagiri ZP Election: चिपळुणातील 13 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

चिपळूण : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत चिपळूण तालुक्यात उमेदवारांची संख्या वाढली होती. तिरंगी लढतीमुळे येथे चुरशीचे सामने झाले. या अटीतटीच्या लढतीत तालुक्यातील एकूण 13 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

यामध्ये जि. प.चे 5 तर पं.स.चे 8 उमेदवार आहेत. विशेष म्हणजे, एकमेव ठिकाणी रिंगणात असणाऱ्या काँग्रेस व शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना आपले डिपॉझिट देखील वाचवता आले नाही.

चिपळूण तालुक्यातील जि. प, पं. स. निवडणुकीत तिरंगी लढती झाल्या. शिवसेना-भाजप युती, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि ठाकरे सेना अशा सरळ लढती झाल्या तर काही ठिक़ाणी चौरंगी सामना देखील पाहायला मिळाला. निवडणूक निकालामध्ये राष्ट्रवादीला पं. स.मध्ये 7, शिवसेनेला 4, भाजपला 3 व ठाकरे सेनेला 4 जागा मिळाल्या. यामध्ये 13 उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही. जि. प.च्या कळवंडे गटात वंचित बहुजन आघाडीच्या गीता जाधव, शिरगाव गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अमिता मोडक, उमरोली गटात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे निलेश चव्हाण तर उमरोलीतील अपक्ष बंडखोर उमेदवार योगेश खांडेकर तसेच बसपाचे कोकरे येथील उमेदवार विकास डिकेे यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

पंचायत समिती गणामध्ये कळवंडे गणातील काँग्रेसच्या मुमताज दलवाई, पेढे गणातील ठाकरे सेनेचे महेश महाडिक, अलोरे गणातील ठाकरे सेनेचे विलास तांदळे, वेहेळे गणातील अपक्ष उमेदवार फैसल सय्यद, सावर्डे गणातील ठाकरे सेनेचे सागर सावंत, गुढे गणातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सायली बंगाल, वहाळ गणातील बसपाचे बुद्धदास सकपाळ, कुटरे गणातील अपक्ष उमेदवार अर्चना रसाळ यांना देखील आपली अनामत रक्कम वाचविता आलेली नाही. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यात एकमेव शिरगाव गणात उमेदवार रिंगणात उतरविला होता. तेथेही डिपॉझिट जप्त झाले तर दुसरीकडे काँग्रेसने कळवंडे गणातून उभे केलेल्या एकमेव उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामुळे 13 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:09 12-02-2026