दापोली: चंडिकानगरमधील दोन मंदिरात भरदिवसा घरफोडी; ४५ किलो वजनाच्या पितळी घंटांसह सीसीटीव्ही कॅमेरा लंपास

दाभोळ: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, आता देवाच्या मंदिरांनाही लक्ष केले जात आहे. तालुक्यातील कोळथरे-गोमराई येथील चंडिकानगरमधील चंडिकादेवी आणि कालिका देवी या दोन प्रसिद्ध मंदिरांमध्ये भरदिवसा घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी मंदिरातील जड वजनाच्या पितळी घंटा आणि सीसीटीव्ही कॅमेरा असा एकूण ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:४५ या वेळेत ही चोरी झाली. चंडिकानगर, गोमराई येथील चंडिकादेवी व कालिका देवी मंदिराचे दरवाजे बंद असताना अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने मंदिरातील मौल्यवान पितळी घंटा चोरून नेल्या. विशेष म्हणजे चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद होऊ नये, या उद्देशाने चोरट्याने मंदिरातील ‘बि प्रो ८०’ कंपनीचा कॅमेरा देखील मेमरी कार्ड आणि सिमकार्डसह चोरून नेला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे.


चोरीला गेलेला मुद्देमाल

मंदिरातून एकूण ९६,००० रुपये किमतीच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

  • पितळी घंटा (१): सुमारे २० किलो वजनाची – किंमत ४०,००० रुपये.
  • पितळी घंटा (२): सुमारे १५ किलो वजनाची – किंमत ३०,००० रुपये.
  • पितळी घंटा (३): सुमारे १० किलो वजनाची – किंमत २०,००० रुपये.
  • सीसीटीव्ही कॅमेरा: ‘बि प्रो ८०’ कंपनीचा कॅमेरा (५६ GB मेमरी कार्ड आणि जिओ सिमकार्डसह) – किंमत ६,००० रुपये.

पोलीस तपास आणि गुन्हा नोंद

या प्रकरणी फिर्यादी सुभाष भिकाजी घुबडे (वय ४६, रा. चंडिकानगर, गोमराई) यांनी दाभोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे १:५४ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५, ३३१(३) अन्वये गु.र.नं. ०९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयित चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.