चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदार संघात महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार शेखर निकम यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पुढे संयुक्तपणे प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी आज (ता. ३०) सायंकाळी कापसाळ येथील माटे सभागृहात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीतून संयुक्तपणे प्रचाराची आखणी होणार असून, नाराजांचे मनोमिलन होणार आहे.
आमदार निकम यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वीच गावभेट दौरा आयोजित करत प्रचाराला सुरवात केली होती. २८ ला निकम यांनी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना शिंदे गटासह भाजप व आरपीआयचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते. निवडणूक प्रचाराची रणनीती आखण्यासाठी महायुतीचा एकोपा गरजेचा आहे. त्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतर संयुक्तपणे शहरासह ग्रामीण भागात प्रचार यंत्रणा राबवण्यात येणार आहे. महायुतीला साथ देण्याचे त्यांनी ठरवले. महायुतीत इच्छुक असलेले शिवसेना शिंदे गटाचे उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण हे देखील निकमांची उमेदवारी दाखल करताना उपस्थित होते. चव्हाण यांनी महायुतीचे प्रामाणिकपणे काम करण्याचे जाहीर केले. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही, याची पुरेपूर दक्षता आमदार निकम यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरात १ नोव्हेंबरनंतर महायुतीतर्फे संयुक्त प्रचाराला सुरवात केली जाणार असल्याची माहितीदेखील उपलब्ध झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 30-10-2024














