रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाच्या सन २०२४-२५ मधील पोलीस भरती प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १०८ पदांसाठी तब्बल ६,४७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने ही माहिती देत भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या भरतीत पोलीस शिपाई पदाच्या १०० जागांसाठी ४,१११ अर्ज आले आहेत. त्यामध्ये १,०२७ महिला व ३,०८४ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. चालक पोलीस शिपाई पदाच्या ८ जागांसाठी २,३६८ अर्ज प्राप्त झाले असून त्यात १३४ महिला व २,२३४ पुरुष उमेदवार आहेत. तृतीयपंथी प्रवर्गातून मात्र एकही अर्ज प्राप्त झालेला नाही.
भरती प्रक्रियेदरम्यान गैरव्यवहार टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. काही भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक, बोगस दलाल किंवा ओळखीचा गैरफायदा घेत उमेदवारांकडून पैशांची मागणी करत असल्याचे प्रकार आढळल्यास तत्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आर्थिक देवाणघेवाणीच्या कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असा इशाराही देण्यात आला आहे. तक्रारी नोंदविण्यासाठी ‘रत्न सेतु’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट (९३७१४१५६१२), पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी (दूरध्वनी : ०२३५२-२७१२५७, ईमेल : sp.ratnagiri@mahapolice.gov.in) तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी (फोन : ०२३५२-२२२८९३, टोल फ्री : १०६४) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे (फोन : २५३४१३८८, ईमेल : spacbthane@mahapolice.gov.in) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
उमेदवारांनी अफवा किंवा अमिषांना बळी न पडता केवळ अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 13-02-2026














