राजापूर नगरपालिकेचा डंका! मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या ‘१५० दिवस सेवाकर्मी’ अभियानात राजापूर नगरपालिकेने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. प्रशासकीय कामात गतिमानता आणि पारदर्शकता आणल्याबद्दल तत्कालीन मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या यशामुळे राजापूर नगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात वैभव गारवे यांचे कौतुक होत आहे.

राज्य शासनाने ६ मे २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सुशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे अभियान राबवले होते. मात्र, राज्यातील पूरस्थितीमुळे या कार्यक्रमाला १० जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या विस्तारित कालावधीत मुख्याधिकारी गारवे यांनी अत्यंत सुनियोजित पद्धतीने काम करत नगरपालिकेला ८० पैकी ८० असे १०० टक्के गुण मिळवून दिले. गारवे यांनी पदभार स्वीकारल्यापासून आस्थापना विषयक सर्व बाबी अद्ययावत करण्यावर भर दिला होता.

या मोहिमेअंतर्गत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे, सरळ सेवा नियुक्ती आणि बिंदू नामावलीचे प्रमाणीकरण करून घेणे यांसारखी महत्त्वाची तांत्रिक कामे यशस्वीपणे मार्गी लावली. विशेषतः प्रशासकीय संवेदनशीलतेचा परिचय देत त्यांनी १०० टक्के अनुकंपा नियुक्त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून दाखवले, ज्यामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे.

प्रशासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी गारवे यांनी विशेष पुढाकार घेतला. केंद्राच्या ‘iGOT’ ऑनलाइन प्रशिक्षण प्लॅटफॉर्मवर सर्व कर्मचाऱ्यांची नोंदणी करून त्यांना प्रशिक्षित केले. कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे आणि कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी त्यांनी घेतलेले विशेष परिश्रम आज फलद्रुप झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारा हा सन्मान वैभव गारवे यांच्या प्रभावी प्रशासकीय कौशल्याची पावती मानली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 14-02-2026