गुहागर : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघात सोमवारी ५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होणार, हे निश्चित मानले आहे.
यापूर्वी उबाठा शिवसेनेचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर सोमवारी आणखी ५ उमेदवारी अर्ज येथून दाखल झाले आहेत. यामध्ये शिंदे सेनेकडून राजेश बेंडल, मनसेकडून प्रमोद गांधी, उबाठा शिवसेनेकडून माजी जि. प. अध्यक्ष व आ. भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव, अपक्ष म्हणून संदीप फडकले, राष्ट्रीय समाज पक्षाकडून प्रमोद आंब्रे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडे दाखल केले.
विक्रांत जाधव यांच्या उमेदवारी अर्जामुळे चर्चेला उधाण
आ. भास्कर जाधव यांचे सुपुत्र व माजी जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने आता गुहागरमधून नक्की कोण लढणार? विद्यमान आ. भास्कर जाधव आयत्यावेळी माघार घेणार की, चिपळुणातूनही अर्ज भरणार? गुहागरची निवडणूक सोपी झाल्याने विक्रांत जाधव यांना आमदारकीची संधी मिळणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. विक्रांत जाधव यांचे नाव गुहागरमधून उमेदवारीसाठी आधीपासूनच चर्चेत होते. मात्र, २४ तारखेला शक्तिप्रदर्शन करीत आमदार भास्कर जाधव यांनी अर्ज भरल्याने या नावाची चर्चा थांबली होती. परंतु, सोमवारी (दि. २८) अचानक विक्रांत जाधव आपल्या सहकाऱ्यांसह गुहागरमध्ये येऊन अर्ज भरुन गेले. त्यामुळे वेगवेगळ्या शक्यता वर्तविल्या जात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 30/Oct/2024














