रत्नागिरी : शिख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदी समागमानिमित्त ‘हिंद-दी-चादर’ या विशेष उपक्रमांतर्गत कामथे आणि गुहागर येथे आयोजित केलेल्या निःशुल्क वैद्यकीय सेवा पंधरवड्यानिमित्ताने आयोजित शिबिरात २२५ जणांची तपासणी करण्यात आली.
गुरूंचा त्याग, शौर्य आणि मानवतेच्या संदेशाला कृतीतून अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयांतर्गत कामथे उपजिल्हा रुग्णालय, गुहागर ग्रामीण रुग्णालयात या उपक्रमांअंतर्गत आरोग्य शिबिर घेण्यात आले. कामथे येथे ९५, गुहागरमध्ये १३० रुग्णांची तपासणी करण्यात आली.समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना, विशेषतः माता व बालकांना, सुलभ व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देणे हा या पंधरवड्याचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमांतर्गत लहान मुलांसाठी व गर्भवती मातांसाठी आवश्यक लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार दिले जात आहेत. यासोबतच विविध आरोग्य विषयांवरील मार्गदर्शन व शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 14-02-2026














