रत्नागिरी: फिनोलेक्स ॲकॅडमीत ‘डिपेक्स २०२६’ ची कल्पना सादरीकरण फेरी उत्साहात!

रत्नागिरी: रत्नागिरी येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीमध्ये ‘डिपेक्स २०२६’ अंतर्गत कोकण विभागासाठीची ‘कल्पना सादरीकरण फेरी’ अत्यंत उत्साहात पार पडली. कोकण विद्यार्थी ट्रस्टच्या वतीने आयोजित या उपक्रमात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७२ विद्यार्थ्यांनी आपल्या २५ नाविन्यपूर्ण संकल्पनांचे दमदार सादरीकरण केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) आणि सृजन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डिपेक्स २०२६’ हे राज्यस्तरीय प्रदर्शन व स्पर्धा असून, तिचे मुख्य आयोजन ५ ते ८ मार्च २०२६ दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. यंदाच्या स्पर्धेची संकल्पना ‘ग्रामीण विकासासाठी सामाजिक नवोन्मेष आणि विकसित भारत २०४७’ अशी निश्चित करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण शिक्षण, आरोग्य, शेती, शाश्वत ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांतील समस्यांवर अभिनव उपाय शोधणाऱ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन दिले जात आहे.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक (तांत्रिक) श्री. रामबाबू संका यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी आणि संशोधनवृत्तीचे महत्त्व पटवून दिले. ‘विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण विचार करून सातत्यपूर्ण शिक्षणावर भर द्यावा,’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी व्यासपीठावर फिनोलेक्स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, अ.भा.वि.प. कोकण प्रांत उपाध्यक्ष प्रा. शिवराज कांबळे, कोकण विद्यार्थी निधी ट्रस्टचे सचिव श्री. स्वप्निल सावंत, डिपेक्स राज्य समन्वयक आयुष पारिख आणि तंत्रशिक्षण विद्यार्थी कार्य प्रांत सहसंयोजक श्री. संकेत सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सादरीकरण फेरीत विद्यार्थ्यांनी मांडलेल्या बहुआयामी आणि उद्योगाभिमुख संकल्पनांना तज्ज्ञांकडून दाद मिळाली, तसेच त्यांना रचनात्मक अभिप्राय देऊन पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी समन्वयन डॉ. संदीप चावडा आणि प्रा. एम. एन. तगारे यांनी केले. या उपक्रमामुळे शैक्षणिक ज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील गरजा सांधणारा एक प्रभावी दुवा निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची प्रेरणा जागृत झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 14-02-2026