बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ..; भारत-अमेरिका व्यापार करारावरून राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापार धोरणावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलेला हा करार म्हणजे भारतीय कापूस उत्पादक शेतकरी आणि गारमेंट उद्योगाला दिलेला ‘धोका’ आहे,” असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यामुळे देशाच्या आर्थिक कणा असलेल्या क्षेत्रांवर गंभीर परिणाम होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘१८ टक्के टॅरिफ विरुद्ध ० टक्के’: नेमका वाद काय?

राहुल गांधी यांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून या करारातील त्रुटी उघड केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार:

  • बांगलादेशचा फायदा: अमेरिकेने बांगलादेशला गारमेंट निर्यातीवर ०% टॅरिफ (कर) सवलत दिली आहे. मात्र, यासाठी अट अशी आहे की बांगलादेशला अमेरिकन कापूस आयात करावा लागेल.
  • भारतावर अन्याय: भारताच्या गारमेंट निर्यातीवर मात्र अमेरिकेने १८% टॅरिफ लादला आहे.

जेव्हा राहुल गांधी यांनी संसदेत यावर प्रश्न विचारला, तेव्हा सरकारने दिलेले उत्तर धक्कादायक होते. “जर भारताला ०% टॅरिफचा फायदा हवा असेल, तर आपल्यालाही अमेरिकन कापूस आयात करावा लागेल,” असे उत्तर मंत्र्यांकडून देण्यात आले. ही बाब सरकारने देशापासून लपवून का ठेवली, असा सवाल गांधी यांनी उपस्थित केला आहे.


‘पुढे आड अन् मागे विहीर’: दुहेरी संकटाची टांगती तलवार

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या या धोरणाला “पुढे आड अन् मागे विहीर” अशी उपमा दिली आहे. त्यांनी यामागची दोन प्रमुख संकटे सांगितली आहेत:

  1. शेतकऱ्यांचे नुकसान: जर भारताने सवलतीसाठी अमेरिकन कापूस आयात केला, तर आपल्या देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला उठाव मिळणार नाही आणि त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल.
  2. वस्त्रोद्योगाचा ऱ्हास: जर आपण अमेरिकन कापूस आयात करण्याचा पर्याय नाकारला, तर भारतीय गारमेंट उद्योगाला १८% टॅरिफच्या ओझ्याखाली दबून जावे लागेल, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत आपले कापड महाग होऊन उद्योग कोलमडेल.

याशिवाय, बांगलादेश आता भारताकडून कापूस आयात कमी करण्याचे संकेत देत आहे, ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवणार आहे.

‘नरेंद्र सरेंडर मोदी’: पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा

पंतप्रधानांवर तीव्र शब्दांत टीका करताना राहुल गांधी यांनी त्यांना ‘नरेंद्र सरेंडर मोदी’ असे संबोधले आहे. “हा करार राष्ट्रीय हिताचा नसून कोणाच्या तरी दबावाखाली केलेला ‘सरेंडर’ आहे. दूरदृष्टी असलेले सरकार शेतकरी आणि निर्यातदार दोघांचाही विचार करते, मात्र मोदी सरकारने दोन्ही क्षेत्रांना मृत्यूच्या दारात उभे केले आहे,” असा आरोप त्यांनी केला.

कोट्यवधींच्या रोजगारावर घाव!

भारतातील वस्त्रोद्योग हा शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग आहे. राहुल गांधी यांच्या मते, या क्षेत्रावर झालेला कोणताही आघात लाखो कुटुंबांना बेरोजगारी आणि आर्थिक संकटात लोटणारा ठरेल. हा करार म्हणजे देशाच्या आर्थिक कण्यावर केलेला वार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:20 14-02-2026